अजेंड्यासाठीच युती होईल - देवेंद्र फडणवीस

अजेंड्यासाठीच युती होईल - देवेंद्र फडणवीस

ठाणे - शिवसेनेशी आमचे अनेक विषयांवर मतभेद आहेत, हे काही लपून राहिलेले नाहीत. आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहे. पण ही युती करताना पारदर्शी कारभाराच्या आधारावर होईल. सत्तेसाठी नव्हे; तर अजेंड्यासाठी युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाच्या विरोधात लढाई सुरू केली असून, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने भाजपला क्रमांक एकचा पक्ष म्हणून निवडून देत त्यांच्या कारभाराला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेबरोबर अनेक विषयांवर मतभेद असल्याने युतीविषयी काळजी न करता निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असा कानमंत्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्याप्रमाणे समोर शत्रू कोण आहेत याचा विचार न करता लढण्यासाठी तयार होत असत, त्याचप्रमाणे मोदी यांचे मावळे म्हणून या निवडणुकीत लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. भाजप आणि शिवसेनेची अनेक विषयांवर वेगवेगळी मते आहेत. अशा वातावरणात भाजप आपल्या दिशेने जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पण त्याच वेळी युतीच्या विषयावर योग्य ठिकाणी योग्य वेळी सध्या चर्चा सुरू असल्याची जोडही त्यांनी दिली. अनेक वर्षांनंतर देशात कॉंग्रेसमुक्तचे वातावरण सुरू असल्याने कॉंग्रेसला बळ मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न असल्यानेच युतीची बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पण केवळ तडजोड म्हणून युती करणार नसून, समान अजेंडा तयार झाला, तरच युती होणार असल्याचा इशारा देण्यास फडणवीस विसरले नाहीत.
आघाडी सरकारने विविध समाजांना एकमेकांच्या विरोधात झुंजविण्यात धन्यता मानली. तर भाजपने समाजाच्या सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अठरा पगड जातींना न्याय मिळण्यासाठी महामंडळ स्थापन केले. तसेच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला समाजाला एकमेकांसमोर उभे करून राजकीय लाभ उठवायचा नसून, त्यांना एकत्र आणून कारभार करावयाचा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व डॉ. सुभाष भामरे, राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, सहप्रभारी खासदार राकेश सिंहजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदींचे अभिनंदन
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या कार्यकारिणीत आर्थिक प्रस्ताव मांडला व नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. या ठरावाला आमदार आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकार व पक्ष संघटनेच्या यशाबद्दल अभिनंदन करणारा राजकीय ठराव मांडला व त्याला आमदार अतुल भातखळकर यांनी अनुमोदन दिले.

जनतेच्या कार्यकर्त्यांनाच तिकीट
तिकिटासाठी नेत्यांच्या मागेपुढे करणाऱ्यांना या वेळीही कोणत्याही परिस्थितीत तिकीट दिले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यानी या वेळी बजाविले. आम्ही जिल्ह्यांचा सर्व्हे केला असून, कोण केवळ नेत्याच्या जवळ आणि कोण जनतेच्या जवळ आहे याची आमच्याकडे माहिती आहे. त्यामुळे जनतेच्या जवळ असलेल्या लोकांनाच तिकिटे दिली जाणार असल्याची तंबी त्यांनी दिली. तसेच नव्याने पक्षात येत असलेल्या लोकांचे स्वागत करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com