जिल्हा परिषदांसाठी आघाड्यांचे 'कडबोळे'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 मार्च 2017

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचे आदेश झुगारत सोयीस्कर आघाड्यांचे "कडबोळे' करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपला बाजूला ठेवत शक्‍य तिथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या राजकीय समीकरणांच्या आघाड्या अस्तित्वात येण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. 21) या निवडणुका होत आहेत.

मुंबई - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचे आदेश झुगारत सोयीस्कर आघाड्यांचे "कडबोळे' करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपला बाजूला ठेवत शक्‍य तिथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या राजकीय समीकरणांच्या आघाड्या अस्तित्वात येण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. 21) या निवडणुका होत आहेत.

शिवसेनेने राज्यात कुठेही भाजपसोबत आघाडी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने भाजपला जिल्हा परिषदांतील सत्तेसाठी तारेवरची कसरत करत काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत करावी लागणार असे चित्र आहे. बहुमताच्या संख्येनुसार भाजपकडे पाच, शिवसेना तीन, काँग्रेस दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन जिल्हा परिषदा आहेत. पण, नऊ जिल्हा परिषदांत प्रथम क्रमांकाच्या भाजपला शिवसेनेची सोबत मिळाली नाही तर सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे, तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिक आघाडी झाल्यास 13 जिल्हा परिषदा, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असे समीकरण झाल्यास, 25 पैकी 20 ते 21 ठिकाणी भाजपविरहित सत्ता येण्याची शक्‍यता आहे.

सध्या अत्यंत चुरशीच्या असलेल्या जिल्हा परिषदांमधे औरंगाबाद, उस्मानाबाद, यवतमाळ, नाशिक, सांगली, जालना, हिंगोली, गडचिरोली, कोल्हापूर, सोलापूर, वाशीम यांचा समावेश आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप यांच्या युती झाल्याने काँग्रेस व शिवसेनेला फटका बसला आहे, तर यवतमाळमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाल्याने काँग्रेसला दणका बसला आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात इतक सर्व पक्ष असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे तीन सदस्य गळाला लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्व या आघाडीला चाप बसला आहे.

नाशिकमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी डाव्या पक्षाच्या तीन सदस्यांना सोबत घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशाला धोबीपछाड देत माजी मंत्री सुरेश धस यांनी पाच सदस्यांचा थेट भाजपला पाठिंबा दिल्याने बहुमतातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून दूर राहावे लागेल, असे चित्र आहे.

एकंदर, उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीत राज्यात ना शिवसेना-भाजप युती, ना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे समीकरण कायम राहण्याची शक्‍यता नसून, भाजपविरोधात इतर सर्व असे नवे समीकरण अस्तित्वात येण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेची भाजपला मदत नाही
शिवसेनेने आक्रमकता कायम ठेवत या निवडणुकीत भाजपशी कोणत्याही परिस्थितीत हातमिळवणी करू नका, असा निरोप दिला आहे. भाजपशी हातमिळवणी केल्यास शिवसेनेचे सहा ठिकाणी अध्यक्ष निवडून आले असते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरल्यास हा आकडा आठवर जातो. त्यामुळे "मातोश्री'वरून कोणतेही आदेश न देता युतीसंबंधीचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडून द्यावयाचा, असा विचार शिवसेनेत पुढे आला होता. मात्र, निवडणुकीच्या केवळ काही तास आधी भाजपला मदत करू नका, असा फतवा "मातोश्री'ने काढला आहे असे सांगण्यात येत होते. शिवसेनेने या संदर्भात कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया न देण्याचे ठरवल्याने युतीतील दरी आणखी वाढते आहे असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपने विदर्भातील चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, जालना तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदा हातात घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली येथे भाजपच्या चिन्हावर, तर सोलापुरात अपक्षाला पाठिंबा देऊन निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना जवळपास पूर्ण केली असतानाच शिवसेनेने या सर्व ठिकाणी भाजपचे मनसुबे धुळीत मिळवण्याची तयारी सुरू ठेवली होती.

समीकरणे आणि हालचाली...

  • कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र
  • यवतमाळमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस युती; भाजपला बगल
  • अमरावतीमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा
  • गडचिरोलीमध्ये काँग्रेस-दीपक आत्राम गट-अपक्ष एकत्र येण्याची शक्‍यता
  • जालन्यात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा अध्यक्ष जवळपास निश्‍चित
  • बुलडाण्यात भाजपची शिवसेनेवर कडी; राष्ट्रवादीला सोबत घेणार
  • औरंगाबादमध्ये शिवसेना-काँग्रेस एकत्र, राष्ट्रवादी-भाजपमध्येही हालचाली
  • परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष (महादेव जानकर)
  • हिंगोलीत भाजपला बगल देत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र
  • उस्मानाबादमध्ये काँग्रेस-शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे चित्र

सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासह धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने राज्यात शक्‍य असेल तेथे जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. काही ठिकाणी अडचणी असल्या, तरी त्यातून मार्ग काढला जाईल.
- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

राज्यात भाजपसोबत आमची मैत्री होती; मात्र आता राज्यात असलेली भाजपसोबतची मैत्री तोडली आहे.
- विश्‍वनाथ नेरुरकर, शिवसेनेचे उपनेते

Web Title: Alliance for ZP Elections