चित्रपटगृहात घरचे खाद्यपदार्थ  आणण्यास परवानगी मिळणार? 

दीपा कदम
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - चित्रपटगृहात घरचे खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी देण्यासह बहुपडदा (मल्टिप्लेक्‍स) चित्रपटगृहांमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थांच्या किमती नियंत्रित असाव्यात, यासाठी ग्राहकस्नेही धोरण आखण्याचा विचार गृह विभाग करीत आहे. दरम्यान, बहुपडदा चित्रपटगृहांच्या असोसिएशनने चित्रपटगृहात खाद्यपदार्थ विकणारे तरुण बेरोजगार होऊ नयेत, यासाठी त्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये घरचे खाद्यपदार्थ आणण्यास मनाई केली जाते. याबाबत खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यावर याचिकाकर्ते आणि बहुपडदा चित्रपटगृह मालकांच्या हरकती-सूचना लक्षात घेऊन याबाबतचे धोरण राज्य सरकार आखणार आहे. याबाबत गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, याविषयी स्पष्ट धोरण नसल्याने चित्रपटगृहाच्या आतपर्यंत खाद्यपदार्थ विकले जातात. बाहेरून खाद्यपदार्थ आणले जाऊ नयेत, याबाबत "महाराष्ट्र सिनेमा अधिनियम-1966'मध्ये स्पष्टता नाही. त्यामुळे यातल्या त्रुटी कमी करण्यासह धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. 

बाहेरचे खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी दिली, तर चित्रपटगृहे तोट्यात चालतील, असा चित्रपटगृहाच्या मालकांचाही दावा आहे. केवळ चित्रपटाच्या तिकीट विक्रीतून चित्रपटगृह चालविणे शक्‍य नसल्याने चित्रपटगृहाच्या आतमध्येही खाद्यपदार्थ वाढीव किमतीत विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

मध्यममार्गाचा विचार 
चित्रपटगृहांच्या मालकांचे शिष्टमंडळ याबाबत मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असल्याचे समजते. यातून सरकारला मध्यममार्ग काढावा लागेल. चित्रपटगृहांमध्ये विकले जाणारे पदार्थ रास्त भावात विकले जावेत; तसेच घरचे खाद्यपदार्थ आणण्यास मनाई केली जाऊ नये, असा मार्ग काढण्याचा गृह विभागाचा विचार आहे. या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Allow to bring home food at the theater