भीम-आधार ऍपच्या माध्यमातून अर्थशास्त्री आंबेडकरांना मानवंदना

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम अर्थशास्त्री होते. त्यांनी समतेच्या तत्त्वावर संविधानाची निर्मिती केली आहे. 20 व्या शतकातील चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र होते. आता 21 व्या शतकातील डिजिटल माध्यमे भीम ऍप आणि भीम आधार ऍपद्वारे बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अनुसूचित जाती, जमाती, विजा-भजा, इमाव, विमाप्र, शासकीय- निमशासकीय अधिकारी- कर्मचारी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झाला, त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, प्राप्तिकर विभागाचे आयुक्त सुबचन राम, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की समाजात विषमता तयार झाली, त्या वेळी माणूस माणसाला कमी लेखत होता. या विषमतेत जगत असतानाच प्रचंड संघर्ष करूनही डॉ. आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य, न्याय, समतेचे संविधान दिले. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य इतिहासात बहुमूल्य आहे. ते उत्तम विधीज्ञ व अर्थशास्त्री होते. त्यांच्या अर्थशास्त्रीय संशोधनाचा देशाला फायदा झाला, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांविषयी आश्‍वस्त करताना फडणवीस म्हणाले, की कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, तर काही मागण्यांसंदर्भात बैठक घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे, त्यावर योग्य निर्णय घेऊ. मंत्रालयातील प्रवेशद्वारांना राष्ट्रपुरुषांचे नाव देण्यासंदर्भातील संघटनेची मागणी व्यवहार्य असून, त्यासाठी राज्यव्यापी धोरण ठरवून निर्णय घेण्यात येईल.

Web Title: ambedkar salute by bhim-aadhar app