विजयाच्या हॅटट्रीकनंतर अमित देशमुखांना मंत्रीपद

हरी तुगावकर
Monday, 30 December 2019

विलासराव देशमुख यांचे 2012 मध्ये निधन झाले. त्यावेळी राज्यात कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. यावेळी श्री. देशमुख यांना तातडीने मंत्रीपदी घेतले जाईल असे लातूरकरांना वाटत होते. पण दीड दोन वर्ष त्यांना मंत्री होण्यासाठी वाट पहावी लागली.

लातूर : महाराष्ट्रात राजकीय घराण्यापैकी एक महत्वाचे घराणे म्हणजे लातूरचे देशमुख घराणे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून गेली तीस चाळीस वर्ष हे घराणे सातत्याने सत्तेत राहिले आहे. विलासराव देशमुख यांनी तर राज्यात दोन वेळेस मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळली. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार अमित देशमुख हे समर्थपणे पुढे नेत आहेत.

राज्यात कॉंग्रेस पक्षातील तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार देशमुख यांनी तर विजयाची हॅटट्रीक साधली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात श्री. देशमुख यांची वर्णी लागणार हे निश्‍चित मानले जात होते. अखेर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. 

श्री. अमित देशमुख यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासून घरातूनच मिळाले आहे. वडिल लोकनेते विलासराव देशमुख यांच्याकडे पाहत श्री. देशमुख राजकारणात आले. शिक्षणाने अभियंते असलेल्या श्री. देशमुख यांनी वयाच्या 21 व्या वर्षी राजकारणात उडी घेतली. 1997 मध्ये लातूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात ते सक्रीय सहभाग घेतला. त्यावेळेसपासून त्यांची राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. 

Image result for amit deshmukh

युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष

2002 ते 2008 या कालावधीत ते युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्षही राहिले. 1999 ते 2008 हा विलासराव देशमुख यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ तर त्यांनी जवळून पाहिला. राज्याचे व देशाचे राजकारण त्यांनी जवळून पाहिले. 2009 मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघाचे दोन मतदारसंघ झाले. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे हे दोन मतदारसंघ. यात 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख यांनी पहिल्यांदा लातूर शहर विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी बसपाचे डॉ. खय्युम खान यांचा सुमारे 90 हजार मतांनी पराभव केला. 

भाऊ मंत्री होताना रितेशचा अभिमानाने भरला ऊर - वाचा

2014 च्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे शैलेश लाहोटी यांचा सुमारे 49 हजार मतांनी पराभव केला. परवाच्या 2019 च्या निवडणुकीत श्री. देशमुख यांचा भारतीय जनता पक्षाचे शैलेश लाहोटी यांच्याशी पुन्हा सामना झाला. यात त्यांनी 40 हजारा पेक्षा जास्त मताधिक्‍य घेत लाहोटी यांचा पराभव तर केलाच पण विजयाची हॅटट्रकीही साधली. 

Image result for amit deshmukh

दोन सख्खे भाऊ आमदार

इतकेच नव्हे तर राज्यात या निवडणुकीतही भाजपचेच वर्चस्व राहिले असे वातावरण होते. कॉंग्रेस राज्यात मागे राहिल असे वातावरण असताना त्यांनी आपले कनिष्ठ बंधू धीरज देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी आणली इतकेच नव्हे तर लाखाच्या मताधिक्‍याने विजयीही केले. एकाच विधानसभेत दोन सख्खे भाऊ आमदार होणे हा एक इतिहासच आहे.

विलासराव देशमुख यांचे 2012 मध्ये निधन झाले. त्यावेळी राज्यात कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. यावेळी श्री. देशमुख यांना तातडीने मंत्रीपदी घेतले जाईल असे लातूरकरांना वाटत होते. पण दीड दोन वर्ष त्यांना मंत्री होण्यासाठी वाट पहावी लागली. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर त्यांना राज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये घेण्यात आले. त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन अशी खाती त्यांना देण्यात आली होती.

Image result for amit deshmukh

एकीकडे राजकारणात आपली पकड निर्माण करीत असताना श्री. देशमुख यांनी सहकार क्षेत्रातही लक्षणीय काम केले आहे. मांजरा, विकास, रेणा साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी साखर कारखानदारीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या क्षेत्रात मराठवाड्यात तर आदर्श निर्माण केलाच पण लातूरची पश्‍चिम महाराष्ट्रालाही त्यांनी दखल घ्यायला लावली आहे.

पक्षातही ते राष्ट्रीय सचिव म्हणून काम करीत आहेत. गोवा राज्याचीही त्यांच्यावर जबाबदारी आहे. तरुण नेतृत्व म्हणून पक्ष त्यांच्याकडे पाहत आहे. यातूनतच त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते मुंबईला कालच रवाना झाले होते.. 

आज लातूरमध्ये सर्वत्र कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Deshmukh Takes Oath As A Cabinet Minister Of Maharashtra Latur Breaking