दोन उंदीर आणि नोटाबंदी

demonisation
demonisation

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात वादळ उठलं आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या पाहिल्या की बँकेत नोटा बदलून घेण्यासाठी लागलेल्या रांगा, या रांगांमध्ये अपवादाने झालेले मृत्यू याचंच चित्रण सगळीकडे दिसतं आहे. पण या नोटाबंदीचा देशावर खरा परिणाम काय होणार, याची चर्चाच कुणी करताना दिसत नाही. एक हजाराची नोट रद्द करुन दोन हजारांची आणल्याबद्दल अनेकांनी मोदींना खुळं ठरवलं. पण देशातल्या ब्लॅकमनी धारकांना एवढी सूट देण्याइतपत भाजप सरकार खुळं नक्कीच नाही. पुढच्या काळात केव्हा ना केव्हा या नोटांवरही गदा येणार किंवा नियंत्रण आणलं जाणार हे नक्की. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि पत्रकार असलेल्या आणि स्वदेशी जागरण मंचाचे सह निमंत्रक असलेल्या स्मामीनाथन गुरुमूर्तींनी आपल्या एका ट्विटद्वारे याचे संकेत दिले आहेतच. एस. गुरुमूर्ती हे संघ परिवारातल्या संघटनांमध्ये थिंक टँक मानले जातात. एवढ्या उडत उडत गप्पा करण्याएवढे ते उथळ नक्कीच नाहीत. 

आज देशात सगळीकडे जो टीकेचा सूर उमटलाय तो वैफल्यापोटी असावा, असं माझं तरी मत आहे. देशात एवढी मोठी घडामोड घडत असताना आपल्याला त्याचा गंधही येऊ नये, ही चिडचिड प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवते आहे. जणूकाही मोदींनी वाजत गाजत, लाल किल्ल्यावरुन विषय आधी जाहीर करुन हा निर्णय सगळ्यांना कळवायला हवा होता. ज्या संस्थेचा हा मूळ प्रस्ताव होता, त्या 'अर्थक्रांती' च्या प्रस्तावाला 'अर्थवांती' म्हणून हिणवलं जातंय. मोदी सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी काय करायला हवं होतं, याचे सल्ले माध्यमांवरच्या चर्चांमध्ये दिले जाताहेत. पण मुळात ही वेळ का आली, याचा विचार यातून मागे पडताना दिसतो आहे. 

हा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्या मुंबई आणि लखनौमधून. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका येऊ घातल्यात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी ज्या पद्धतीने सरकारच्या नोटबंदी निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या, ते पाहता त्यांचं खूप काही दुखलं असंच दिसतंय. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना अचानक विरोधी बाकांवरच्यांसारखा सूर काढायला लागलीये. दुसरीकडे आम आदमीपक्षही या निर्णयावर विव्हळतोय. अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर केलेल्या उपोषणातून पुढे आम आदमी पक्षाचा जन्म झाला. अण्णा हजारेंसारखे पूर्वीपासूनच काळ्या पैशांबद्दल बोलत आलेत. आताही अण्णांनी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचं खुलं स्वागत केलं आहे. पण त्यांच्याच तालमीत वाढलेले अरविंद केजरीवाल मात्र वावदुकाप्रमाणे वागत आहेत. अण्णांनी या बाळाचे पाय जंतरमंतरवरच पाहिले असावेत. म्हणूनच पुढे त्यांनी केजरीवालांपासून फारकत घेतली. 

आज मुंबईत राज ठाकरे यांनी या निर्णयावर विखारी टीका केली आहे. घरात दोन उंदीर शिरले म्हणून अख्खं घर जाळायला निघालात, असं राज ठाकरे मोदींना सुनवू पहात आहेत. एकतर मनसेचं स्वतःचं घर जळत असताना तिथली आग विझवायची सोडून ते दुसऱ्याच्या घरातली आग शोधायला निघालेत. 'आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांशी बोललो, त्यांनाही हा निर्णय मान्य नाही,' असंही राज ठाकरे म्हणालेत. एकतर राज ठाकरे यांना संघाची संस्कृती ठाऊक नसावी. स्वतःच्या मनात काय चाललं आहे हे स्वतःच्या चेहेऱ्यावरही दिसू न देण्याइतकी चलाखी संघवाल्यांच्या अंगात भिनलेली असते. त्यामुळे संघाचे नेते  अशा महत्त्वाच्या निर्णयाबद्दल राज ठाकरे यांच्यासारख्यांशी चर्चा करतील, असं वाटत नाही. 'मोंदींना काळ्या पैशाबद्दल एवढा तिरस्कार होता, तर मग ते निवडून आले कसे,' असाही एक सवाल राजनी विचारलाय. एकतर बेधडक बोलण्याबद्दल राज प्रसिद्ध आहेत. मग त्यांनी असा आडून आडून आरोप का करावा? मोदी काळ्या पैशावर निवडून आले, असं थेट म्हटलं असत तरी चाललं असतं. 

नोटा छापणे सहा महिन्यांपासून सुरु होतं असाही एक शोध राजनी लावलाय. सहा महिन्यांपूर्वी नोटा छापायला सुरुवात झाली, मग त्यावर सध्याचे आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी कशी, असा सवाल राज ठाकरे विचारत आहेत. नोटा छापायला सहा महिन्यापूर्वी सुरुवात झाली होती, हे कुठं वाचल्याचं आठवत नाही. कदाचित हा खास 'मनसे' शोध असावा. 'मनसे कडे माणसांची कमतरता नाही. पण फंडिंगची होती. इतर पक्ष दोन पायांवर चालणार आणि आम्ही लंगडी घातल...' असंही एक वक्तव्य राज यांनी केलय. याचा अर्थ देशात निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ चालतो, हे त्यांना मान्य असावं. आता सरकारच्या निर्णयामुळे सारी चिडचिड बाहेर पडतेय, असा अर्थ कुणी अशा वक्तव्यांमधून लावला तर त्यात गैर ते काय? 
 
'आधी एकमेकांकडे न पाहणारे आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत,' हे राज यांचे म्हणणं अगदी खरं आहे. कारण 'समानशीले समव्यसनेषु सख्यम्' हे संस्कृत सुभाषित आहेच आणि ते सत्यही आहे. एकूण काय, 'बुडलोsssहो,' असे थेट न सांगता एकूण निर्णयच कसा चुकीचा आहे या पावित्र्याची ढाल केली जाते आहे. 

राज यांच्या आजच्या भाषणातून एक प्रश्न मात्र मनात येतोय, आणि तो विचारल्याशिवाय राहवत नाहीये. राज ठाकरे यांनी उल्लेख केलेले 'ते दोन उंदीर' नक्की कुठले? पुढचे काही दिवस याचंच उत्तर शोधण्यात जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com