
मुंबई : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत नगरसेवक आणि पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला असून एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे असं वक्तव्य केलं. त्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपने १५० जागा निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवल्याने मुंबई महापालिकेवर वर्चस्व असलेली शिवसेना मुंबईतून हद्दपार होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(Shivsena vs BJP BMC Election)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला असून येणाऱ्या निवडणुकांत मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल. उद्धव ठाकरे यांना आता जमीन दाखवायची वेळ आली आहे म्हणून ही आपली शेवटची निवडणूक आहे असं समजा कारण अभी नही तो कभी नही... असा आदेश शहांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या युतीसमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा निभाव लागणार का? हे पहावं लागणार आहे.
शाहांचा सेनेवर हल्लाबोल
"2014च्या निवडणुकीत फक्त दोन जागेसाठी शिवसेनेनी भाजपसोबतची युती तोडली. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला पण राजकारणात धोका देणारा कधीच यशस्वी होत नाही. त्यामुळे त्यांना आता शिक्षा व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे." असं वक्तव्य अमित शाह यांनी आपल्या भाषणात केलं.
शिवसेना ही स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली. पण एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आता आपल्याला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयार रहायचं आहे असा आदेश त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला.
हिंदूविरोधी राजकारण संपवायचंय - शाहांचा इशारा
उद्धव ठाकरेंना जमीन दाखवायची वेळ आली आहे असं म्हणत शाहांनी आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचं आहे असं सूतोवाच केलं आहे. मुळात शिवसेना ही हिंदुत्त्ववादी विचारांची असली तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाची धार बोथट झाली असल्याचा आरोप शिवसेनेवर होत आहे. त्यानंतर आता मुंबईतून संपूर्ण शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे का? असाही सवाल निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदेंचा मुंबई महापालिकेतून पत्ता कट?
मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार असा इशारा अमित शाहांनी दिल्यामुळे आता शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या महापालिकेत शिंदे गटाला महापौरपद मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपसोबत युती असलेल्या शिंदे गटाचाही महापालिकेतून पत्ता कट होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.