ठाकरे-शहा यांच्यात बंद दाराआड चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

मुंबई - शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत यावे, नाराजीचे मुद्दे सोडवता येतील, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी "समर्थना'साठी शिवसेनेशी संपर्क केला. शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात "मातोश्री'वर सुमारे सव्वा तास बंद दाराआड चर्चा झाली. तीन वर्षांतील काही उदाहरणे देत उद्धव यांनी काही विषयांवर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या चर्चेत भाग घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजप आणि शिवसेना यांची युती सैधान्तिक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र राहण्याचे आवाहन अमित शहा यांनी उद्धव यांना केले. हिंदुत्ववादी भूमिका लक्षात घेता आजवर एकत्र लढलो; पण शिवसेनेच्या भावनांची योग्य दखल घेण्याचे आवाहन या वेळी उद्धव यांनी केले. नाणार प्रकल्पासह काही गोष्टींमध्ये शिवसेनेचे मत विचारात घेतले जात नाही, याबद्दल या भेटीत नाराजीही व्यक्त करण्यात आली. मात्र, ठाकरे यांनी शहा यांना वेळ दिल्याने युतीतील मैत्री पूर्णतः संपली नसल्याचे मानले जाते. 

शहा यांच्यासोबत "मातोश्री'वर मुख्यमंत्री फडणवीसही हजर होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबद्दल काही आक्षेप असल्याने ते तेथे गेले नाहीत. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शहा आणि फडणवीस यांचे स्वागत केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांना या बैठकीपासून दूर ठेवा, अशी अटवजा सूचना भाजपने केली होती, असे समजते. भेटीनंतर उद्धव आणि शहा यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. शिवसेनेने काही आक्षेप नोंदवले असले, तरी युतीबाबतची चर्चा अद्याप संपली नसल्याचे मानले जाते. 

या बैठकीनंतर शहा यांनी भाजपच्या राज्यातील निवडणूक समितीची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेशी समन्वय कायम ठेवण्याचे संकेतही दिले; मात्र शिवसेनेने पालघरसारखी आगळीक केल्यास उत्तर देण्यास विसरू नये, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

ठाकरेंच्या घरी ढोकळा, गाठिया... 
भाजपने बऱ्याच दिवसांनंतर मधाचे बोट दाखवल्याने शिवसेनेने शहा यांना "मातोश्री'वर बुधवारी गुजराती पदार्थांची मेजवानी दिली. ढोकळा, खांडवी, गाठिया मागवण्यात आल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. 

"संपर्क तो बहाना है!' 
सिद्धिविनायक मंदिरात पत्रकारांशी संवाद साधताना "संपर्क तो बहाना है, मोदी सरकार को जिताना है', असे शहा म्हणाले. शिवसेनेसोबतच्या बैठकीबाबत मात्र अधिक टिप्पणी न करता त्यांनी केलेले वक्तव्य भाजपच्या भूमिकेचे निदर्शक मानले जात आहे. 

Web Title: Amit Shah & Uddhav Thackeray Discussion