"ओ मामी, बजेटवर एक रॅप साॅंग लवकर घेऊन या"; अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल 

टीम ई सकाळ 
Tuesday, 2 February 2021

अमृता फडणवीस नेहमीच अशी काही पोस्ट करतात ज्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडतात.अशाच एका पोस्टमुळे त्या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. 

नागपूर : अमृता फडणवीस आणि ट्रोलिंग हे समीकरणच झालं आहे. त्यांनी केलेल्या एखाद्या ट्विटवर आणि पोस्टवर ट्रोलर्स कमेंट्सचा भडीमार असतो. आता यात लोकांचीही काय चूक म्हणा. अमृता फडणवीस नेहमीच अशी काही पोस्ट करतात ज्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडतात.अशाच एका पोस्टमुळे त्या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. 

आता कालचीच गोष्ट घ्या, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काल म्हणजेच १ फेब्रुवारीला देशाचं आर्थिक बजेट सादर केलं. देशातील विविध स्तरातील लोकांकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आल्या. अनेकांनी जनतेचा हिताचा अर्थसंकल्प असं म्हंटलं तर अनेकांनी या अर्थसंकल्पावर टीकाही केली. मात्र अमृता फडणवीस यांनी यावर ट्विट करताना थेट वर्षांची सीमा ओलांडली आहे. असा अर्थसंकल्प गेल्या १०० वर्षांत  बघितला नाही असं त्यांनी ट्विट केलंय.

हेही वाचा -  देशाला स्वातंत्र्य मिळून झालीत ७३ वर्ष अन् अमृता...

आता अमृता फडणवीस असं ट्विट करतील आणि त्याची सोशल मीडियावर चर्चा होणार नाही हे शक्यच नाही. त्यामुळे ट्विट बघताच लोकांनी त्यावर कमेंट्सचा भडीमार केला. इतकंच नाही तर अमृता फडणवीसांच्या ट्विटच्या बातम्यांखालीही लोकांनी ट्रोलिंगला सुरुवात केली. बघता बघता त्यांच्या या वक्तव्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. 

Image may contain: text that says "निर्मुल अमृतानुभव.. शतकोत्तर अर्थसंकल्पावर एक रॅप साँग.. झिंगाटटाईप लवकरच घेऊन या... Like Reply Message- 5h 3"

एकानं सोशल मीडियावर "निर्मल अमृतानुभव..शतकोत्तर..अर्थसंकल्पावर एक रॅप साॅंग.. झिंगाटटाईपण लवकरच घेऊन या." अशाप्रकारची कमेंट केली आहे. तर अमृता फडणवीसांचं वय काय आणि त्या बोलतात काय? असा सवालही एकानं फेसबुकबर बातमीखाली विचारला आहे. विशेष म्हणजे अनेक सुजाण नागरिकांकडून त्यांना नोव्हेंबर १९४७ रोजी सादर झालेल्या भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाची आठवण करून देण्यात आली आहे. अशा अनेक कमेंट्समुळे अमृता फडणवीस चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. 

 

एकूणच काय तर अमृता फडणवीसांनी केलेल्या एका ट्विटमुळे त्यांना ट्रोल करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या ट्रोलर्सना मनस्वी आनंद मिळाला असंच म्हणावं लागेल.  

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amruta Fadanvis trolled by social media users again over Budget 2021