अमृता फडणवीसांनी केले प्रियांका गांधींचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबईः प्रियांका गांधी-वद्रा यांची काँग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असली तरी त्याचा भारतीय जनता पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. पण, प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत आहे, असे अमृता फडणवीस यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे.

मुंबईः प्रियांका गांधी-वद्रा यांची काँग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असली तरी त्याचा भारतीय जनता पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. पण, प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत आहे, असे अमृता फडणवीस यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे.

प्रियांका गांधी-वद्रा यांची काँग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी बुधवारी (ता. 23) नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत अनौपचारिक किंवा अंशतः राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रियांका यांचे सक्रिय राजकारणातले हे अधिकृत पदार्पण मानले जाईल. त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या विभागातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचा समावेश होतो ही उल्लेखनीय बाब आहे. लोकसभेची निवडणूक प्रियांका गांधी लढविणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह असले तरी ती शक्‍यता नाकारता येत नसल्याचे काँग्रेस वर्तुळातून सूचित करण्यात आले.

एका वृत्तवाहिणीशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाले, 'कोणत्याही महिलेने राजकारणात प्रवेश करणे हे सगळ्या महिलांच्या हिताचे असते. प्रियांका गांधी यांना राजकारणात का आणले हा काँग्रेसचा प्रश्न असला तरी त्यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत आहे. शिवाय, राजकारणात त्या सक्रिय झाल्या असल्या तरीही भाजपावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. भाजपासाठी ही काही फार मोठी घटना नाही. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी अशा दोन जागा काँग्रेसने जिंकणं हा भाजपासाठी धक्का नाही.'

दरम्यान, प्रियांका यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष सुरू केला आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर तसेच रायबरेलीमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. दुसरीकडे भाजपने त्यांच्यावर घराणेशाहीची टीका केली आहे. मात्र, अमृता फडणवीस यांनी वेगळे मत नोंदवत प्रियांका गांधी यांचे स्वागत केले आहे.

Web Title: amruta fadanvis welcome to priyanaka gandhis political entry