Amruta Fadnavis: "अमृता आमची लहान सूनबाई, त्यामुळे..."; लाच प्रकरणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया | Amruta Fadnavis bribe Case reaction of Congress leader nana patole | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole Amruta Fadnavis
Amruta Fadnavis: "अमृता आमची लहान सूनबाई, त्यामुळे..."; लाच प्रकरणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Amruta Fadnavis: "अमृता आमची लहान सूनबाई, त्यामुळे..."; लाच प्रकरणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

अमृता फडणवीस यांना १० कोटींची लाच ऑफर करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावरुन विधानसभेतही चांगलाच गदारोळ माजला होता. या प्रकरणावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, "अमृता आमची लहान सुनबाई आहे, देवेंद्र माझे भाऊ आहे. त्यामुळं त्यांच्यावर कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही. मात्र, गृहमंत्री यांचं घर सुरक्षित नसेल तर ही चिंतेची बाब आहे."

अमृता फडणवीस यांना १० कोटींची लाच ऑफर केल्याप्रकरणी तसंच ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानी या डिझायनरला ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून तिची चौकशी सुरू आहे. अनिक्षाकडे अमृता फडणवीस यांचे काही व्हिडीओ आणि ऑडिओ आहेत, ते व्हायरल करीन अशी धमकी अनिक्षाने दिली आणि त्या बदल्यात १० कोटींची लाच मागितल्याचा आरोप होत आहे.

अनिक्षाने आपले वडील अनिल जयसिंघानी यांच्यावरचे आरोप दूर करण्यासाठी हे केल्याचा दावाही करण्यात येत आहे. तसंच या प्रकरणामध्ये अमृता फडणवीस यांच्या साहाय्याने देवेंद्र फडणवीसांना अडकण्याचा कट असू शकतो, असा दावाही पोलिसांनी तपासानंतर केला आहे.