आता अमृता वहिनी म्हणतात, मी पुन्हा येईन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  •  अमृता फडणवीस यांनी शायरीतून मी पुन्हा येईन, असे म्हटले आहे.

मुंबई : मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... असे म्हणत फडणवीस यांनी आपला शब्द खरा करुन दाखवत, परत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी परंतु, अवघ्या तीन दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, आता अमृता फडणवीस यांनी शायरीतून मी पुन्हा येईन, असे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवरुन शायरीतून आपलं मत मांडताना पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दे... असे म्हणत मी पुन्हा येणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्रानं मला गेल्या 5 वर्षे वहिनी म्हणून जे प्रेम दिलं, त्याबद्दल महाराष्ट्राचे आभार. मी गेली 5 वर्षे माझी भूमिका माझ्या क्षमतेनुसार चांगली निभावली आहे, असे अमृता यांनी म्हटलं आहे. 

फडणवीस यांनी मी पुन्हा येईन... असे विधान केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं गणित आखलं होतं. पण, अजित पवारांच्या फुटीरतावादी खेळीनं पवारांच गणित बिघडलं. राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली होती. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला होता. 

दिवसभरात नेमकं काय घडलं? मिनीट मिनीट टू घडामोडी

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली असून त्याजागी उद्धव ठाकरे पदभार सांभाळणार आहेत. महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amruta fadnavis tweet about Thanks Maharashtra Public