
Savitribai Phule Death Anniversary : गरोदर विधवांसाठी लढणारी १७५ वर्षांपूर्वीची स्वतंत्र महिला...
Savitribai Phule Death Anniversary : सावित्रीबाई फुलेंबद्दल माहीती नाही अशी कोणतीच स्त्री नाही, बहुदा प्रत्येका स्त्रीने जिचे आभार मानावे अशी एकमेव व्यक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले. वेळेप्रसंगी लोकांच्या शिव्याश्राप ऐकून क्रांती घडवण्यासाठी धडपडणारे आपल्याकडे कमी नाही, त्यात जर त्या महिला असतील तर त्यांच्या विषयी वेगळंच अप्रूप वाटतं.
सावित्रीबाई त्याच महिलांमधल्या एक होत्या, अर्थात त्यांच्या या कारकिर्दीत ज्योतिबा फुलेंचा वाटा मौलाचा आहे. त्या दोघांचे लग्न झाले तेव्हा सावित्रीबाई अवघ्या ९ वर्षांच्या तर ज्योतिबा फक्त १३ वर्षांचे होते. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या घरीच शिक्षण दिले.
ज्योतिरावांकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्याकडे होती. त्यांनी स्वतःला दोन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करुन घेतले. त्यांचे प्रशिक्षण पाहता, सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या असतील. सावित्रीबाईंची जन्मतारीख, म्हणजे ३ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
मुलींची पहिली शाळा :
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या.
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
गरोदर विधवांच्याही मदतीला धावल्या सावित्रीबाई :
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या.
ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले
सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण :
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.