अंधेरीत पूल कोसळून पाच जखमी ; रेल्वेसेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

कोसळेला पूल हा महापालिकेचा असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी हा दावा तत्काळ खोडून काढला. हा पूल रेल्वेचाच असल्याचा प्रतिदावा त्यांनी केला. त्यामुळे आता या अपघातामुळे पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

मुंबई : अंधेरी येथे पादचारी पूल रेल्वेवर कोसळल्याने पाच जण जखमी झाले असून, त्यातील दोघे गंभीर आहेत. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेचे वाहतूक अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. तर सतत सुरु असलेल्या पावसाने मध्य रेल्वेही ठप्प पडली असून, रस्ते वाहतूकही धीम्या गतीने सुरु होती. 
अंधेरी येथे रेल्वेवरील पादचारी पूल आज सकाळी पडला. त्यामुळे ऐन वर्दळीच्या वेळी रेल्वे वाहतूक ठप्प पडली. नंतर काही काळाने चर्चगेट ते वांद्रे आणि गोरेगाव ते विरार वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र, यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

https://www.facebook.com/SakalNews/videos/10155931446691973/

पूर्व पश्‍चिम जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर रस्त्यांवरही वाहनांची प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. अंधेरी स्थानकाच्या फलाट क्रमांक सात आणि आठवर या पुलाचा भाग कोसळला. यात पाच जण जखमी झाले असून, त्यातील सिंह (48) आणि एक 60 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर विलेपार्ले येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

पूल पडल्यामुळे पश्‍चिम रेल्वे ठप्प पडलेली असतानाच सतत सुरु असलेल्या पावसाने मध्य आणि हार्बर रेल्वेही ठप्प पडली. कुर्ला शिवदरम्यान रेल्वे रुळांमध्ये पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी थांबविण्यात आली होती. तर रस्त्यांवरही अशीच परिस्थिती होती. हिंदमाता, किंग्जसर्कल येथे पाणी तुंबल्यामुळे उपनगरातून दक्षिण मुंबईत जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. 

दरम्यान, या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून, यातील तीन जण किरकोळ जखमी आहेत. तर दोन जण गंभीर जखमी आहे. यातील जखमी अस्मिता काटकर यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर डावा हात गमावण्याची वेळ आली आहे. यातील जखमींना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

पुलाचे राजकरण 

कोसळेला पूल हा महापालिकेचा असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी हा दावा तत्काळ खोडून काढला. हा पूल रेल्वेचाच असल्याचा प्रतिदावा त्यांनी केला. त्यामुळे आता या अपघातामुळे पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

'' या दुर्घटनेचे राजकारण करु नये. 32 लाख प्रवाशांना उशीर झाला याकडे माझे लक्ष आहे. पूल दुरुस्तीवरून गोंधळाचे वातावरण आहे. वाहतूक सुरळीत होण्यास प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. याबाबत सर्व स्ट्रक्चरल ऑडिट मी स्वत: केले आहे. 150 ते 200 पूल असून, याचे चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे", असे अशी माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.

Web Title: Andheri Bridge Collapse Five Injury two serous