सामाजिक कार्यात गणेश मंदिरांचा पुढाकार 

सामाजिक कार्यात गणेश मंदिरांचा पुढाकार 

सर्व संकष्टी चतुर्थींपैकी महत्त्वाची म्हणजे अंगारक चतुर्थी. भाविक गावातील, शहरातील गणेश मंदिरात जाऊन भक्तिभावाने पूजा करतात. या दिवशी उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो. अनेक भाविक आवर्जून या दिवशी श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. विविध शहरांतील गणेश मंदिरे तेथील नागरिकांची श्रद्धास्थाने झाली आहेत. अशी मंदिरे आता सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहेत. समाजातील उपेक्षितांना मदतीचा हात देत आहेत. त्यांच्या कार्याविषयी- 

सामाजिक कार्यात आघाडीवर 
नागपूर - श्रीगणेश टेकडी मंदिर केवळ नागपूरकरांचेच नव्हे तर जगभरातून नागपुरात येणाऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. क्रिकेट सामन्यासाठी येणारा सचिन तेंडुलकर आवर्जून टेकडी गणेशाचे दर्शन घेत असे. सीताबर्डी किल्ल्याला लागून असलेल्या गणेश टेकडी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रम होतात. धार्मिकच नव्हे तर सामाजिक कार्यातही येथील ट्रस्ट अग्रगण्य आहे. ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे होतात. विशेष म्हणजे धर्मार्थ दवाखान्याद्वारे नागरिकांची नियमित तपासणी आणि औषध वाटप होते. याशिवाय सामाजिक संस्थांना दानातून आर्थिक मदतीचे काम ट्रस्टद्वारे होते. 

सामुदायिक विवाहांचे आयोजन 
सोलापूर - महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात 1893 मध्ये झालेली असली तरी सोलापुरात 1885 पासून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे. लोकमान्य टिळक सोलापुरात आल्यानंतर त्यांनी श्री आजोबा गणपतीपासून प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना महाराष्ट्रात आणि पुढे भारतभर रुजविली. 
श्रद्धानंद समाज सार्वजनिक श्री आजोबा गणपती ट्रस्टकडून दरवर्षी सामुदायिक विवाहांचे आयोजन केले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना हजारो वह्यांचे वाटप ट्रस्टकडून होते. कुष्ठरुग्णांना तसेच कॅन्सरग्रस्तांनाही आर्थिक मदत करण्यात येते. विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य ट्रस्टकडून देण्यात येते. कारगिल युद्धातील सैनिकांना तसेच दुष्काळग्रस्तांना मदत, वृक्षारोपण असे उपक्रमही राबविण्यात येतात. पर्यावरण वाचवा, बेटी बचाओ, सर्वशिक्षा अभियान अशा सरकारच्या विविध उपक्रमांचा प्रसारही अनेक वर्षांपासून ट्रस्टकडून करण्यात येतो. 

इच्छापूर्ती गणेश मंदिरातर्फे अन्नदान 
जळगाव :
शहरातील बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात इच्छापूर्ती गणेश मंदिर असून, श्रीगणेशाची विलोभनीय मूर्ती मंदिराचे वैशिष्ट्य आहे. देवस्थानात दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होते. गणेश जयंतीला पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागतात. अन्नदानाचा कार्यक्रम होतो. मंदिर ट्रस्टच्या वतीने गरिबांसाठी दररोज दहा रुपयांत पोळी-भाजीचे जेवण वर्षभर उपलब्ध केले जाते. उन्हाळ्यात पाणपोईद्वारे वाटसरूंची तहान भागविण्याचा उपक्रमही दरवर्षी होतो. जिल्ह्यात श्रीक्षेत्र पद्मालय, श्रीक्षेत्र तरसोद ही गणपतीची प्रसिद्ध देवस्थाने आहेत. राज्यभरातून या मंदिरांमध्ये चतुर्थीला भक्त दर्शनासाठी येतात. 

रुग्णांसाठी विविध उपक्रम 
पुणे - 
अंगारक चतुर्थीचा योग यंदाच्या वर्षी तीन वेळा आला आहे. मंगळवारी (ता. 14) दीड वर्षाने अंगारक चतुर्थी आली असून, धार्मिक प्रथा, परंपरेनुसार चतुर्थीला होमहवन, गणेशयाग, अथर्वशीर्षाच्या सहस्रावर्तनांचे नियोजन आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान, देवदेवेश्‍वर संस्थान पर्वती व कोथरूड, दशभुजा गणपती मंदिर, रमणा गणपती यांसारख्या पेशवेकालीन मंदिरांसहित श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिरातही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या प्रमुख विश्‍वस्त संगीता ठकार म्हणाल्या, ""पहाटे श्रींच्या मूर्तीस अभ्यंगस्नान घालून अथर्वशीर्षाची सहस्रावर्तने आणि गणेशयाग होईल.'' श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ""मंदिरात पहाटे तीन वाजता स्वराभिषेक होईल. शास्त्रीय संगीत गायक श्रीनिवास जोशी व त्यांचे चिरंजीव विराज यांचे यानिमित्ताने गायन आहे. त्यानंतर अभिषेक, गणेशयाग आहे.'' दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयात दररोज रुग्णांना दर्जेदार पौष्टिक जेवण दिले जाते. देवदासींच्या मुलांसाठी शाळा चालवली जाते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून त्यांना कौशल्यविषयक शिक्षण मिळते. मोफत रुग्णवाहिका आणि रुग्णांना आर्थिक सहकार्य केले जाते. सामाजिक संस्थांच्या कार्यांना ट्रस्टतर्फे हातभार लावला जातो. 

पाणीयोजनांसाठी भरीव मदत 
मुंबई -
 येथील सिद्धिविनायक मंदिर नेहमीच सामाजिक कार्यारत अग्रसेर असते. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पाणी योजना राबविण्यासाठी 34 जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले आहेत. अत्याधुनिक इ-लायब्ररी, डिजिटल लायब्ररी तसेच वाचनालयाची स्थापना केली. आरोग्यविषयक जनजागृतीच्या हेतूने शालेय मुलांसाठी लिटिल हार्ट मॅरेथॉनचे आयोजन केले. येथील डायलिसिट सेंटरमध्ये गरजूंना अत्यंत कमी दरात उपचाराची सोय केली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय सहाय्य केंद्रात रुग्णांना आरोग्य सल्ला दिला जातो. मंदिरातर्फे आरोग्य शिबिरे, नेत्रशिबिरांमध्ये विनामूल्य चिकित्सा, रक्तदान शिबिरांचे आयोजन होते. गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया व उपचारांसाठी अर्थसाह्य केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com