Anil Parab : अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ, 'साई रिसॉट'प्रकरणी ईडीकडून कोर्टात आरोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Resort Dapoli Anil Parab ED

Anil Parab : अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ, 'साई रिसॉट'प्रकरणी ईडीकडून कोर्टात आरोपपत्र दाखल

मुंबई : दापोलीमधील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात आज ईडीच्या वतीने विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला असून परब यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप केले आहेत. तसेच याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे.

परब यांना तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. आरोपपत्रात या तिघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे असे कळते. मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाहीरपणे परब यांच्यावर या प्रकरणात आरोप केले आहेत.

सोमय्या वारंवार पत्रकार परिषद घेऊन अनेक कागदपत्रे यामध्ये जाहीर करत असतात. तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानेदेखील या रिसॉर्टवर कारवाई केली आहे. परब यांनी सातत्याने या प्रकरणात माझा संबंध नाही, असे जाहीर केले असले, तरी ईडीने त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले आहे.

आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यावर सर्व आरोपींना भूमिका विचारण्यात येते. त्यानंतर न्यायालय आरोप निश्चित करते आणि मग खटल्याला प्रारंभ होतो. आज ईडीच्या वतीने विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaAanil parab