राज्यात जनावरांची चाऱ्याविना उपासमार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

सोलापूर - राज्य सरकारने चारा छावण्यांसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, छावण्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर येत आहेत. परंतु, अद्यापही छावण्या सुरू झाल्या नसल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सांगितले.

सोलापूर - राज्य सरकारने चारा छावण्यांसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, छावण्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर येत आहेत. परंतु, अद्यापही छावण्या सुरू झाल्या नसल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सांगितले.

दुष्काळी तालुक्‍यांमधून आतापर्यंत एक हजार ४०३ कोटींचे तब्बल चार हजार २३७ छावण्यांचे प्रस्ताव दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सोलापूर, नगर, नाशिक, औरंगाबाद, गडचिरोली, जालना, अमरावती, सांगली, पुणे, उस्मानाबाद, बीड, बुलडाणा येथील दुष्काळी तालुक्‍यांमधून छावण्यांची मागणी आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये चारा लागवडीसाठी सरकारने ३५ कोटी रुपयांच्या बियाणे दिले, परंतु बहुतांशी ठिकाणी चारा उगवला नाही, तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी चारा लागवडच केली नाही. 

राज्यातील लघु व मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून, धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर जनावरांची चाऱ्याअभावी हाल होत असल्याचे चित्र आहे.

अत्यल्प मदत
जनावरांना ७० ते ११५ रुपयांच्या चाऱ्याची गरज असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सरकारकडून मोठ्या जनावरांच्या चाऱ्यासाठी ७० रुपये, तर लहान जनावरांसाठी ३५ रुपये दिले जात आहेत.

आठ ठिकाणी छावण्या
राज्यातील सात गोरक्षण संस्थांना औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद याठिकाणी प्रत्येकी एक, तर बीड आणि नगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, अशा आठ ठिकाणी सात हजार ३५७ जनावरांना छावण्याच्या माध्यमातून चारा उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव डॉ. विजय चौधरी यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animal Fodder Shortage water