अंजली दमानिया ट्रोल; राज ठाकरे यांच्यावरील टीका भोवली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाती जपण्याचे संस्कार बाळासाहेबांपासून - राऊत
मुंबई - नातेसंबंध जपण्याचे संस्कार बाळासाहेबांपासूनच असल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची पाठराखण केली. राज ठाकरे सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोचल्यानंतर राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, की ‘ईडी’च्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असे काल उद्धव ठाकरे म्हणाले आणि मलाही तेच वाटते. स्वतः उद्धव ठाकरे या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. वैयक्तिक मित्र म्हणून राज ठाकरेंबाबत ज्या उद्धव ठाकरे यांच्या भावना आहेत, त्याच माझ्याही आहेत.

मुंबई - कोहिनूर मिल जमीन कथित गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांना सोशल मीडियात टीकेचा मारा सहन करावा लागला.

आज सकाळी १०.३० च्या सुमारास राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला, मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि बहीण यांच्यासोबत दादर येथील कृष्णकुंज या निवासस्थानावरून ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधत राज ठाकरे सहकुटुंब ‘ईडी’च्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असे खोचक ट्‌विट केले. त्यांच्या या ट्‌विटला मनसेचे माहिम-वडाळा विधानसभेचे प्रभारी यशवंत किल्लेदार यांनी सडेतोड उत्तर देत, ‘कौटुंबिक वात्सल्य, कौटुंबिक नाती आणि कौटुंबिक प्रेम हे आमचे संस्कार आहेत; ते दमानिया यांना कळणार नाही,’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. मनसेचे नवी मुंबईतील पदाधिकारी गजानन काळे यांनीही त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘भाजप सरकार आल्यापासून पाच वर्षे दमानिया छटपूजेसाठी बसल्या होत्या की काय, असा सवाल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anjali damania troll Raj Thackeray Comment Politics