अण्णा हजारे आंदोलनावर ठाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

राळेगणसिद्धी - लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, तसेच राज्य कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याबाबतच्या आश्‍वासनांची केंद्र सरकारने पूर्तता केलेली नाही. याबाबत चार वेळा पत्रव्यवहार करूनही सरकार त्यावर गंभीर दिसत नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे महात्मा गांधी जयंतीपासून (दोन ऑक्‍टोबर) उपोषणास बसणार असल्याचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना पाठविले आहे.

पत्रात हजारे यांनी म्हटले आहे, की केंद्रीय कृषी विभागाच्या नियंत्रणाखाली कृषिमूल्य आयोगाला काम करावे लागते. त्यामुळे राज्य कृषिमूल्य आयोगाने ठरविलेल्या किमतीत काटछाट करून शेतीमालाचे भाव ठरविले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यासाठी राज्य कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता देणे आवश्‍यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत समिती स्थापन करून निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यांनी आश्‍वासन पाळलेले नाही.

वृद्ध शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतल्या गेला नाही. भ्रष्टाचारमुक्त भारतनिर्मितीबाबत हे सरकार गंभीर नाही. सत्तेवर आल्यानंतर लगेच लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती करण्याचे आश्वासनही पाळण्यात आले नाही. त्यामुळे येत्या दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारलाच लोकपाल नको
पंतप्रधानही लोकपालच्या कक्षेत येत असल्याने सरकार त्याची नियुक्ती करीत नसावी, असे वाटते. केंद्रातील लोकप्रतिनिधी व सर्व अधिकारी लोकपाल कक्षेत येतात. भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केल्यास लोकपालपीठ त्यांची चौकशी करील. त्यामुळे सरकारला लोकपाल नको आहे, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Anna Hazare fix in the movement