अण्णांचे उपोषण मागे

अण्णांचे उपोषण मागे

नगर - लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सुरू केलेले उपोषण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी आश्‍वासनानंतर सातव्या दिवशी मागे घेतले. फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे पत्र हजारे यांना दिले.

शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, स्वामिनाथन आयोग कोणताही आडपडदा न ठेवता लागू करावा, अशी भूमिका अण्णांनी बैठकीत मांडली. विविध प्रश्नांवरील चर्चा समाधानकारक झाल्याने उपोषण सोडण्याचे अण्णांनी मान्य केले. विविध मागण्यांसाठी अण्णांनी आतापर्यंत २२ वेळा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. राळेगणसिद्धीमधील यादवबाबा मंदिरात केलेले प्रत्येक उपोषण यशस्वी झाले आहे. 

चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य सरकारने अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. उपोषण मागे घेण्यासाठी जलसंपदामंत्री महाजन सुरवातीपासून प्रयत्न करीत होते. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. पुढे देशाचे उत्पन्न वाढल्यानंतर त्यात वाढ केली जाईल. शिवाय त्यात राज्य सरकारही आपला काही हिस्सा घालणार आहे.’’

‘कृषी मूल्या’साठी प्रयत्न
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘लोकायुक्तांच्या संदर्भात अण्णांचा आग्रह होता की लोकायुक्त कायदा नव्याने करावा, त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी. लोकपाल निवड समितीची १३ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. महाराष्ट्रात लोकायुक्ताचा नवा कायदा आणि त्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल. अर्थसंकल्पी अधिवेशनात आम्ही या संदर्भातला मसुदा मांडू. तसेच समितीत अण्णा हजारेंनी सुचवलेले सदस्य आणि सरकारचे सदस्य असतील. कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळण्याच्या दृष्टिकोनातून स्वायत्त अध्यक्ष नेमले आहेत. हमीभावासाठी सी २ + ५० ही पद्धत अवलंबली पाहिजे अशी अण्णांची मागणी होती. त्यासाठी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती ऑक्‍टोबरपर्यंत सरकारला शिफारशी सादर करणार. यात हजारे यांच्या वतीने सोमपाल काम शास्त्री करतील.’’

‘‘शेतकरी सन्मान योजनेतून अल्प भूधारक शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक साह्य जाहीर करण्यात आले आहे. या निधीत वाढ करावी अशीही मागणी अण्णा हजारेंनी केली होती. या मागणीबाबतही आम्ही विचार करतो आहोत. शेतकऱ्यांच्या निधीत वाढ करण्याचा आमचा मानस आहे. यात राज्याचा वाटा असण्यासाठीही प्रयत्न करणार आहोत,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

या वेळी अण्णा म्हणाले, ‘‘आज जी चर्चा झाली, त्यात मी समाधानी आहे. त्यामुळे मी माझे उपोषण मागे घेत आहे.’’ त्यानंतर झालेल्या ग्रामसभेत तोलाबाई दामोदर पठारे या ९० वर्षे वयाच्या आजीच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन हजारे यांनी, तर उपसरपंच लाभेश औटी यांनीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.

राधामोहन सिंह आधीच गेले
केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह चर्चा अर्धवट सोडून निघून गेले. तत्पूर्वी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांत केलेल्या कामाची माहिती अण्णांना दिल्याचे त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले. 

राळेगणमध्ये चूल पेटली नाही
राळेगणसिद्धीमधील यादवबाबांच्या मंदिराच्या आवारात ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. सकाळपासून गावातील एकही चूल पेटलेली नव्हती. गाव बंद आणि उपोषणस्थळी लेकराबाळांसह ग्रामस्थ बसलेले होते. त्यात कोणत्या मुद्द्यावर चर्चा अडली, यावरून ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला होता.  

‘राष्ट्रवादी’चे दिवंगत नेते आर. आर. पाटील आज हयात असते, तर अण्णांचे उपोषण सोडण्यासाठी इतका वेळ लागला नसता. अण्णांचे वय आणि तब्येतीची काळजी करून सरकारने तत्काळ मागण्या मान्य करायला हव्या होत्या.
- आमदार सुमन पाटील (आर. आर. पाटील यांच्या पत्नी)

... या मागण्या मान्य
 लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत स्वतंत्र समिती स्थापन करून येत्या दहा महिन्यांत नवीन सक्षम कायदा तयार करणार. 
 कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याबाबत कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापणार. त्यात हजारे यांचे प्रतिनिधी असतील. 
 कृषिमूल्याच्या संदर्भात कायद्यात बदल करणार. 
 नाशवंत शेतमालाला भाव कसा मिळेल यावरही विचार सुरू. 
 ऑक्‍टोबरपर्यंत सर्व शिफारशी करणार 

अण्णांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह राळेगणसिद्धी येथे दुपारी दोनच्या सुमारास पोचले. त्यांनी बंद खोलीत अण्णांबरोबर चर्चा केली. अखेर सुमारे पाच तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर हजारे यांनी उपोषण मागे घेतले. 

या वेळी त्यांच्या समवेत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी कृषिमंत्री सोमपाल शास्त्री, किसान महासंघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हेही उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com