नियोजनशून्य कारभाराचा दुसरा फटका

परीक्षेचे नियोजन करणाऱ्या न्यासा कंपनीच्या नियोजनशून्य कारभाराचा उमेदवारांना एकदा नव्हे दोनदा फटका बसला.
नियोजनशून्य कारभाराचा दुसरा फटका
नियोजनशून्य कारभाराचा दुसरा फटकाsakal

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दयनीय परिस्थिती कोरोनामुळे प्रकर्षाने पुढे आली. त्यातून धडा घेत आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणासाठी नानाविध उपाय करण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. त्याचाच एक भाग म्हणजे नोकरभरती. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या परीक्षेसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले; मात्र परीक्षेचे नियोजन करणाऱ्या न्यासा कंपनीच्या नियोजनशून्य कारभाराचा उमेदवारांना एकदा नव्हे दोनदा फटका बसला. त्यामुळे आरोग्य विभागाला खरंच नोकरभरती करायची आहे की नाही, असा सवाल संतप्त उमेदवारांनी विचारला आहे.

‘‘गेल्या महिन्यात २५ व २६ सप्टेंबरला आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड परीक्षेसाठी आम्ही नवी मुंबईतून तीन दिवसांचा रोजगार सोडून औरंगाबादला गेलो. तेथून जवळपास १०० किलोमीटरवर असलेल्या कन्नड येथे परीक्षा केंद्र असल्याने तयारी म्हणून एक दिवस आधीच पोहोचलो. एक हजार रुपये भाड्याने खोली घेतली; मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने आम्हाला धक्काच बसला. त्यामुळे नाइलाजास्तव औरंगाबादला व तेथून खासगी ट्रॅव्हल्सने नवी मुंबईला परतलो. या सर्व धावपळीत चारपाच हजार रुपयांचा फटका बसला. आता २४ ऑक्टोबरला पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्याऐवजी जळगावला परीक्षा केंद्र दिले आहे. त्यामुळे पूर्वीचा त्रास बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे.’’ नवी मुंबईतील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात परिचारक म्हणून काम करणाऱ्या सुरेंद्र सोनवणेची ही व्यथा.

आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड पदांच्या परीक्षेचे नियोजन दुसऱ्या प्रयत्नातही फसल्याचे राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या आक्रोशावरून दिसत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा सुरळीत पार पडण्याबाबतचे दिलेले आश्वासन, मुख्यमंत्र्यांनी परीक्षेबाबत बैठक घेऊन ‘न्यासा’च्या कारभाराबाबत व्यक्त केलेली नाराजी, हे सर्व हवेतच विरल्याचे चित्र आहे. पूर्वी २५ व २६ स्प्टेंबरला होणारी ही परीक्षा प्रवेशपत्राच्या गोंधळामुळे परीक्षेला अवघे काही तास शिल्लक असताना पुढे ढकलावी लागली. त्यामुळे किमान पुढील वेळेस तरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र पूर्वीचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. सुरेंद्रप्रमाणेच शरद कोचाळे, अक्षय सोनावणे, किरण सांगिरे यांनीदेखील परीक्षेसाठी औरंगाबाद केंद्र निवडले असताना त्यांना थेट अमरावती केंद्र देण्यात आले. विशेष म्हणजे पूर्वी औरंगाबाद केंद्र दिले असताना आता केंद्र का बदलले, असा सवाल त्यांनी केला आहे.

त्याचप्रमाणे नवी मुंबईतील एका उमेदवाराला त्याने पूर्वी निवडल्याप्रमाणे पनवेल केंद्र दिले होते; मात्र सुधारीत परीक्षेसाठी अमरावती केंद्र दिले आहे. राज्यभरातून अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सरकारला खरंच ही परीक्षा घ्यायची आहे का, अशी शंका येत असल्याचा मुद्दा शरद कोचाळे या उमेदवाराने उपस्थित केला. सर्वसामान्य मुलांनी परीक्षा देऊन नोकरीला लागावे, अशी सरकारचीच इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता परीक्षा द्यावी की नाही, अशा मनस्थितीत असल्याचेही त्याने बोलून दाखवले.

नियोजनशून्य कारभाराचा दुसरा फटका
लसीकरण पूर्ण झालेले स्थळ हवे; 75 टक्के वधु-वरांची अपेक्षा

आरोग्य विभागाची ही परीक्षा देणारे जवळपास सर्वच विद्यार्थी हे गरीब व मध्यमवर्गीय आहेत; मात्र आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य काराभारामुळे अभ्यास सोडून धावपळीतच त्यांची पूर्ण शक्ती खर्च होत आहे आणि त्याचा मोठा आर्थिक फटकाही त्यांना बसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने आपल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देत नव्याने प्रवेशपत्र द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पदासाठी २४ ऑक्टोबरला; तर गट ‘ड’ पदासाठी २५ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे; मात्र याचदरम्यान मुंबई पोलिस शिपाई (चालक) भरतीतील पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि वाहन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. २० ते २६ ऑक्टोबरपर्यंत या चाचण्या होणार आहेत. काही विद्यार्थ्यांनी पोलिस व आरोग्य या दोन्ही विभागांतील पदांसाठी अर्ज केले आहेत; मात्र त्यांच्या परीक्षेच्या तारखा एकाच वेळी आल्याने त्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

एकाच परीक्षेसाठी दोनदा शुल्क

गट ‘क’ पदातील स्टाफ नर्ससाठी दीक्षा राऊत या परीक्षार्थीने दोनदा शुल्क भरल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरून परीक्षेचे शुल्क ऑनलाईन भरल्यानंतरही अर्ज सबमिट झाला नाही; मात्र बँक खात्यातून पैसे कमी झाले. शेवटची तारीख असल्याने मी लगेच पुन्हा ऑनलाईन पैसे भरले. तेव्हा दुसऱ्या प्रयत्नात माझा अर्ज सबमिट झाल्याचे दीक्षाने सांगितले. दोन वेळा पैसे भरले गेल्याने ते परत मिळावेत, यासाठी संकेतस्थळावरील हेल्पलाईनशी संपर्क साधला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ई-मेललाही रिप्लाय आला नाही असे दीक्षाने सांगितले. हा प्रकार अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला आहे.

हेल्पलाईन बिनकामाची

प्रवेश पत्रासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, अकोला, लातूर, नाशिक या प्रत्येक मंडळांसाठी प्रत्येकी दोन हेल्पलाईन क्रमांक आणि चार मेल-आयडी देण्यात आले आहेत; मात्र फोन लावल्यावर त्याला प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत; तसेच मेल पाठवला तरी त्याला रिप्लायच मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांचा संताप

आरोग्य विभाग गट ‘क’च्या पदभरतीसाठी उमेदवारांना परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवाराने अर्ज केलेल्या जिल्ह्यातच त्याला परीक्षा केंद्र दिल्याचे स्पष्टीकरण आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिले आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानेही याबाबत तीन पानी स्पष्टीकरण जारी केले आहे; मात्र या स्पष्टीकरणातील सर्व दावे उमेदवार खोडून काढत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com