भाजपविरोधी पटेल शिवसेनेला पटले 

संजय मिस्कीन - सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - शत-प्रतिशत भाजपचा नारा दिला जात असतानाच भाजपच्या हुकमी "व्होटबॅंक'ला सुरुंग लावत शिवसेनेने पटेल या प्रभावी समाजासोबत भाजपविरोधी गुजराती मतदारांच्या बेरजेच्या राजकारणात बाजी मारली आहे. पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याने आज "मातोश्री'वर येत शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्धार केल्याने भाजप गोटात अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. 

मुंबई - शत-प्रतिशत भाजपचा नारा दिला जात असतानाच भाजपच्या हुकमी "व्होटबॅंक'ला सुरुंग लावत शिवसेनेने पटेल या प्रभावी समाजासोबत भाजपविरोधी गुजराती मतदारांच्या बेरजेच्या राजकारणात बाजी मारली आहे. पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याने आज "मातोश्री'वर येत शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्धार केल्याने भाजप गोटात अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. 

सध्या भाजपने शिवसेनेला चारीमुंड्या चित करण्याचा विडा उचलत मुंबई महापालिका निवडणुकीत कडवे आव्हान उभे केले आहे. सत्ताकारणात भाजपने शिवसेनेवर चढाई केलेली असली तरी बेरजेच्या राजकारणात मात्र शिवसेनेने हार्दिक पटेल याला खेचून भाजपला धोबीपछाड देण्याची तयारी केल्याचे मानले जाते. 

मुंबईत गुजराती समाजाचे 22 ते 24 लाख मतदार आहेत. बहुतांश प्रभागांत हा समाज निर्णायक भूमिका पार पाडू शकतो. यात पटेल समाजाचे 10 टक्के मतदार आहेत. गुजराती समाजातले काही घटक भाजपसोबत असले तरी पटेल समाज मात्र विरोधात असल्याचे चित्र आहे. भाजपची सर्वस्वी मदार या गुजराती मतदारांवरच असल्याने शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे करण्याची रणनिती भाजपने आखली होती; पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हार्दिक पटेलला सोबत घेण्यात यश मिळवल्याने शिवसेनेच्या बेरजेच्या राजकारणात भर पडल्याचे चित्र आहे. हार्दिक पटेल याला शिवसेनेसोबत जोडण्याची कामगिरी पार पाडण्यात एका दिग्गज गुजराती व्यापाऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. "शहा' आडनावाचे उद्योजक व उद्धव ठाकरे यांच्यात मित्रत्वाचे संबध आहेत. आदित्य ठाकरे व हार्दिक यांच्यात मैत्री आहे. त्यातच हार्दिक पटेल याचा आदर्श केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत; तर पाटीदार पटेल व मराठा हे शेतकरी असून या दोन्ही समाजांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असल्याचे हार्दिक पटेल नेहमी सांगतो.

मराठा आरक्षणालाही हार्दिकने पाठिंबा दिलेला आहे. पाटील-पटेल-जाट एकत्र यावेत यासाठी हार्दिकने देशभर मोहिम छेडली आहे. त्यामुळे ऐन मुंबई मनपा निवडणुकीच्या रिंगणात हार्दिकचा शिवसेनेशी केलेला समझोता भाजपची डोकेदुखी ठरण्याचे चिन्हे दिसत आहेत. आज "मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते शिवसेनेचे गुजराती उमेदवार यांच्या प्रचारात सहभागी झाले. गुजरातेत पटेलांसोबतच इतर समाजातही हार्दिकची क्रेझ असल्याने मुंबईत शिवसेनेच्या मतांचा टक्का वाढण्यास मदतच होईल, असा राजकीय वर्तुळात विश्वास व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti-BJP Patel