ठाकरे गटाकडे क्रीडा क्षेत्राच्या विस्ताराचा आराखडा नाही; अनुराग ठाकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Thakur uddhav thackeray has no plans to expand sports mumbai corporation delhi

ठाकरे गटाकडे क्रीडा क्षेत्राच्या विस्ताराचा आराखडा नाही; अनुराग ठाकूर

नवी दिल्ली : ठाकरे गटाकडे असलेल्या मुंबई महापालिकेकडे क्रीडा क्षेत्राच्या विस्ताराचा काहीही आराखडा नसल्याची टीका माहिती आणि प्रसारण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुंबई दौऱ्यात केली. हा आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी महापालिकेला दिली असून महिनाभरात त्याबाबतचा अहवाल केंद्राला सादर करण्यास सांगितले आहे.

जिंकता न आलेल्या १४४ जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून अशा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुंबईतील दक्षिण मध्य आणि कल्याण या लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी ठाकूर यांच्याकडे आहे. कल्याण मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत खासदार आहेत; तर शिंदे गटातून लोकसभेचे गटनेते झालेले राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आहेत.

या दोन्ही मतदारसंघांकडे भाजपने लक्ष दिल्याचे सांगताना ठाकूर म्हणाले, भाजपची ताकद वाढल्यास त्याचा फायदा युतीलाच होणार आहे. मागील तीन वर्षांत काही त्रुटी राहिल्या असतील, तर दीड वर्षात त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यासाठीच शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन आढावा घेतला जात आहे.

संघटनात्मक ताकद वाढवणे आणि केंद्राच्या लागू न झालेल्या योजनांची वेगाने अंमलबजावणी करणे, या हे दौऱ्याचे उद्दिष्ट होते. यादरम्यान पन्नाप्रमुख, आयटी सेल, सोशल मीडिया विभाग, बूथ अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली. त्याचप्रमाणे दौऱ्यात स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीबद्दलही विचारणा केल्याचे ते म्हणाले. स्मार्ट सिटी योजनेची कामे कल्याणमध्ये झाली नसल्याचे तसेच मुंबई महापालिकेकडे क्रीडा क्षेत्राच्या विकासाचा आराखडा नसल्याचे आणि सार्वजनिक शौचालय सुविधांचा मुंबईत अभाव असल्यावरही ठाकूर यांनी बोट ठेवले.

कल्याणमध्ये खड्डे!

त्यांनी सांगितले, की स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेल्या कल्याणमध्ये मात्र काहीही काम झाले नसून रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आढळले. केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, पक्की घरेदेखील लाभार्थ्यांना मिळू दिली नसल्याचे आढळून आले. आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या योजनांची वेगवान अंमलबजावणी करा, अशा सूचना दिल्या.

वर्षभरात सार्वजनिक शौचालये

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाच्या पाहणीदरम्यान, लाभार्थ्यांना शौचालये मिळाली नसून मुंबई महापालिकेने सार्वजनिक शौचालयेदेखील बांधली नसल्याचे दिसले. दोन वर्षात शौचालये बांधू, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते; मात्र वर्षभरात सार्वजनिक शौचालये बांधण्याचे महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले असून दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यात त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्याचे आदेश दिले असल्याचेही ठाकूर म्हणाले. शिवाजी पार्क मैदानामध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहे, खेळण्यासाठी येणाऱ्या मुलींना कपडे बदलण्याची जागा नसल्याकडे लक्ष वेधताना यासाठी फिरत्या प्रसाधनगृहांची व्यवस्था उभारण्याबाबतही आदेश दिले.

Web Title: Anurag Thakur Uddhav Thackeray Has No Plans To Expand Sports Mumbai Corporation Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..