शिक्षक अनुदानासाठी ३२ अभ्यासगटांची नियुक्ती 

दिलीप वैद्य
शनिवार, 7 डिसेंबर 2019

रावेर : आगामी काळात राज्यातील शिक्षकांना वेतन देण्याऐवजी प्रति विद्यार्थी अनुदान देण्याबाबत शासन गंभीरपणे विचार करीत असून, याबाबत प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी एका अभ्यासगटाची नियुक्ती शिक्षण आयुक्तालयाच्या एका पत्रात करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी (पुणे) यांनी ४ डिसेंबरला पाठविलेल्या पत्रात यासह शिक्षण विभागाच्या विविध ३२ विषयांसाठी ३२ अभ्यास गटांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अभ्यास गटांना ३१ डिसेंबरपूर्वी आपल्या शिफारशी सादर करण्यास सांगण्यात आले असून, अनुकूल अहवाल आल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. 

सध्या संच मान्यतेनुसार शिक्षक निश्चिती करण्यात येते व शिक्षकांना वेतन अनुदान देण्यात येते. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणाऱ्या टिप्पणीवर संस्थेस प्रति विद्यार्थी अनुदान देण्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांना वेतन अनुदान देण्याऐवजी प्रति विद्यार्थी अनुदान संस्थेस अदा केल्यास शासनाच्या आर्थिक भारावर काय परिणाम होईल? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ शकेल का? यावर अभ्यास करण्यासाठी एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या या अभ्यास गटात एकूण सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विषयाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करणे, मुख्याध्यापकांची पदे सरळसेवेने भरणे,केंद्रप्रमुख या पदाचे सक्षमीकरण करणे, माध्यान्ह भोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, खासगी शिकवणी वर्गाचे सनियंत्रण करणे आदी विविध ३२ विषयांवर अधिक अभ्यास करण्यासाठी ३२ अभ्यास गटांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपूर्वी या सर्व अभ्यासगटांनी आपल्या शिफारसी सादर करणे अपेक्षित आहे. अभ्यास गटाने प्रति विद्यार्थी अनुदान देण्याची शिफारस केल्यास ज्या वर्गात कमी विद्यार्थी असतील त्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना अन्य शिक्षकाच्या तुलनेने कमी वेतन मिळेल. एकाच प्रकारचे कर्तव्य करणाऱ्या दोन शिक्षकांना कमी-अधिक वेतन मिळण्याच्या या चर्चेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 
या अभ्यास गट नियुक्तीचे पत्र राज्यातील सर्वच शिक्षक आणि शिक्षक संघटनापर्यंत पोहोचले आहे. ज्या विविध ३२ विषयांबाबत अभ्यासगटांची नियुक्ती झाली आहे, त्यातील काही विषय रद्द करावेत; अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. 

ज्या कारणासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे, ते कारण प्रथमदर्शनी शिक्षकहित विरोधी वाटत असले तरीही अभ्यास गटाची पहिली बैठक झाल्यानंतर किंवा संपूर्ण शिफारशींचा अभ्यास केल्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करणे उचित राहील. आणि त्यातील शिफारशी शिक्षक हिताविरुद्ध असल्यास शिक्षक संघटना त्या शिफारशींना विरोध करतील. 
- जे. के. पाटील, 
अध्यक्ष, जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, जळगाव. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of study groups for teacher grants