ऑनलाइन अर्जाद्वारे शेतकऱ्यांना 25 कोटी रुपयांचे पीककर्ज मंजूर 

प्रमोद बोडके
Thursday, 2 July 2020

कर्ज हवे असणाऱ्या शेतकऱ्यांनी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवांकडे मागणीचा अर्ज भरून द्यावा. त्यासाठी गटसचिव शेतकऱ्यांना मदत करतील. शेतकरी सोसायटीचा सभासद असेल आणि त्यास सोसायटी कडून पीक कर्ज मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज सोसायटी सचिवांकडे द्यावा. सचिव हे अर्ज संबंधित राष्ट्रीयकृत बॅंकांकडे पाठविणार आहेत. 
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची अग्रणी बॅंक असलेल्या बॅंक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटपासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खरिपासाठी वेळेत मुबलक कर्जपुरवठा करण्यासाठी अग्रणी बॅंकेने पुढाकार घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 649 शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईनने प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 225 अर्जावर प्रक्रिया करण्यात आली असून नामंजूर झालेल्या अर्जदार शेतकऱ्यांना सुमारे 25 कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप सुलभ व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले आहेत. त्यातील एक भाग म्हणून सहकार विभागाच्या यंत्रणेतून शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांऱ्यांना पीक कर्ज मागणीचा अर्ज ऑनलाईनही करता येईल अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाच्या https://solapur.gov.in संकेतस्थळावरील ऑनलाइन अर्ज भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. पीक कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तालुक्‍याच्या सहकार निबंधक किंवा तहसीलदार कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 

पीक कर्जाचा अर्ज करण्यासाठी वेबसाइट, लिंक 
शेतकऱ्यांनी पीक कर्ज मागणी अर्ज भरण्यासाठी https://solapur.gov.in या संकेतस्थळावर (पीक कर्ज मागणी अर्ज : 2020-2021 वर क्‍लिक करावे) अथवा https://solapur.gov.in कोरोना - पीक कर्ज मागणी अर्ज 2020-2021 लिंकवरील फॉर्म भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करावी. नोंदणीमध्ये काही अडचण आल्यास आपल्या गावातील दत्तक बॅंक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approve crop loans of Rs 25 crore to farmers through online application