तुर खरेदीच्या वादात राज्यमंत्री खोतकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 मे 2017

खरेदी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची कॉंग्रेसची मागणी

खरेदी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची कॉंग्रेसची मागणी
मुंबई - राज्यातला शेतकरी तूर विकण्याकरिता वणवण करित असताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबियांची 377 क्विंटल तूर दोन दिवसात कशी काय खरेदी केली जाऊ शकते ? असा सवाल करीत इतक्‍या मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड होण्याची शक्‍यता कमी असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये जवळपास साडेचार लाख टन तुरीचे उत्पादन झाले त्यातील एक लाख टनापेक्षा अधिक तूर ही केवळ 800 लोकांनी विकली आहे. तूर खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केल्यानंतर सरकारने नेमलेल्या चौकशी समितीतर्फे जालना जिल्ह्यातील सर्वाधीक तूर विकणाऱ्या 800 लोकांची यादी दिली आहे. त्यात खोतकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव आहे. खोतकर कुटुंबियांनी 14 फेब्रुवारी रोजी 187 क्विंटल आणि 18 फेब्रुवारी रोजी 190 क्विंटल अशी एकूण 377 क्विंटल तूर दोन दिवसात नाफेडच्या खरेदी केंद्रावर विकली. या प्रकरणाची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पातळीवर सुरु असून राज्याच्या मंत्रीमंडळातील एका विद्यमान मंत्र्यांची एवढ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी होऊन निष्कर्ष निघेल असे दिसत नाही. या अगोदरही कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांना क्‍लीन चीट दिली होती. त्यामुळे अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तूर खरेदी खरेदी प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. या प्रकरणात "दाल मे कुछ काला' नव्हे तर संपूर्ण "डाळंच काळी' असल्याचे सावंत म्हणाले.

शासनातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावे, हे अपेक्षित असताना राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडून स्वहितच साधण्याचे काम कसे सुरु आहे, ते या प्रकरणावरून दिसून येते. मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या या सरकारला राज्यातील जनताच धडा शिकवेल असे सावंत म्हणाले.

Web Title: arjun khotkar in tur purchase dispute