पाचवी पिढी देशसेवेत!

सुनील शेडगे
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नागठाणे - देशाला आजवर हजारो लष्करी जवान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिलिटरी) गावाची आगळी सैनिकी परंपरा आजदेखील वृद्धिंगत होते आहे. प्रकाश निकम यांच्या कुटुंबातील पाचवी पिढी सध्या देशसेवेत कार्यरत आहे. देशसेवेचा आणि त्यासाठी आपण करत असलेल्या त्यागाचा या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे.

नागठाणे - देशाला आजवर हजारो लष्करी जवान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिलिटरी) गावाची आगळी सैनिकी परंपरा आजदेखील वृद्धिंगत होते आहे. प्रकाश निकम यांच्या कुटुंबातील पाचवी पिढी सध्या देशसेवेत कार्यरत आहे. देशसेवेचा आणि त्यासाठी आपण करत असलेल्या त्यागाचा या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे.

अपशिंगेच्या सैनिकी परंपरेचा अगदी देशभर लौकिक आहे. गावाच्या नावाला जोडूनच ‘मिलिटरी’ हा शब्द रूढ झाला आहे, यावरूनच गावाची महती आणि कर्तृत्व लक्षात येते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावाला सैनिकी सेवेची भुरळ पडली आहे, ती आजतागायत कायम आहे. गावाने आजवर हजारो सैनिक दिले आहेत, त्यातील कित्येकांनी उच्च पदे भूषविली आहेत. कार्यकर्तृत्वाने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गावातील अनेक कुटुंबांच्या पिढ्यान्‌ पिढ्या लष्करी सेवेत कार्यरत आहेत. प्रकाश निकम यांचे कुटुंब अशांपैकीच एक. त्यांच्या कुटुंबातील पाचवी पिढी सध्या देशसेवेत आहे.

प्रकाश निकम यांचे वडील (कै.) कृष्णदेव निकम १९४५ मध्ये लष्करात रुजू झाले. स्वतः प्रकाश हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचे बंधू युवराज आणि मनोहर हेदेखील लष्करी सेवेत होते. त्यांची मुले आशिष व अक्षयकुमार, पुतणे अभिजित, अनिकेत, गौरव हे सध्या कार्यरत आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रकाश यांचे पणजोबा (कै.) लक्ष्मण जोतीराम पवार, आजोबा (कै.) हणमंत, मामा (कै.) सदाशिव (सर्व सुर्ली, ता. कोरेगाव) हेही 
लष्करात होते. 

इतकेच नव्हे; तर त्यांचे बंधू, मेहुणे, व्याही आदींचे नातेवाईक यापैकी कुणी न्‌ कुणी लष्करी सेवा बजाविली आहे. आपले संपूर्ण कुटुंबच देशसेवेत गुंतलेले आहे, याचा प्रकाश यांना विलक्षण अभिमान वाटतो.

अपशिंगेची आगळी परंपरा
पहिल्या महायुद्धात अपशिंगेतील ४६ जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. आझाद हिंद सेनेतही गावातील जवानांचा सहभाग होता. चीन, पाकिस्तान, बांगलादेश युद्धात येथील जवानांनी मर्दुमकी गाजविली होती. जवान हा शब्द गावाचा प्राण असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत निकम, उमेश निकम यांनी सांगितले.

माजी सैनिकांचे प्रश्‍न सरकारने बऱ्यापैकी सोडविले आहेत. मात्र आजी-माजी सैनिकांचा घरफळा अद्याप माफ केलेला नाही. फक्त विधवांना घरफळा माफ केला जात आहे. हा लाभ सर्व आजी-माजी सैनिकांना मिळायला हवा. तसेच, शेतसारा माफ केला पाहिजे. केंद्राने वन रॅंक वन पेन्शन केली; परंतु हा प्रश्‍न समाधानकारकरीत्या सुटलेला नाही, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या दूर करणे गरजेचे आहे.
- कॅप्टन उदाजी निकम (अध्यक्ष, महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटना).

देशाची सेवा करण्याची संधी मिळणे, ही भाग्याची गोष्ट आहे. त्यादृष्टीने आमच्या गावाचा उल्लेख आदराने होतो, त्याचा खूप आनंद होतो.
- प्रकाश निकम

Web Title: Army Day Special Prakash Nikam Apshinge Motivation