कार्तिकी सोहळ्यात सुमारे चार लाख भाविकांचा सहभाग 

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

पंढरपूर - "पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थ व्रत' या एकाच भावनेने आज लाखो विठुभक्तांनी कार्तिकी यात्रा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. राज्याचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यासह विविध प्रांतांतून सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी आज पंढरीत श्री विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. चंद्रभागा स्नानाच्या पर्वणीसाठी भाविकांनी पहाटेपासूनच नदीवर गर्दी केली होती. स्नानानंतर नगरप्रदक्षिणेला निघालेल्या दिंड्यांमधील वारकऱ्यांच्या विठुनामाच्या जयघोषांनी पंढरीनगरी दुमदुमून गेली होती. 

एकादशीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा आदी राज्यांतून लाखो भाविक आले आहेत. दोन दिवसांपासून विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आज एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. आज सकाळी सातला दर्शनरांग गोपाळपूर रोडपर्यंत गेली होती. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना 17 ते 18 तास लागल्याचे नारायण हणमंत नेवळ (रा. निवळी, ता. मुखेड, जि. नांदेड) या भाविकाने सांगितले. या वर्षी श्री विठ्ठल मंदिर समितीने कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने दर्शनरांग आणि दर्शन मंडपात पिण्याचे पाणी, आरोग्य, चहा आदी सुविधा दिल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. 

दोन दिवसांपासून पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बंद झाल्याने भाविकांची मोठी तारांबळ उडाली. आज सकाळी एटीएम सुरू होणार असल्याचे समजताच भाविकांनी शहरातील विविध बॅंकांच्या एटीएम केंद्रांसमोर रांगा लावल्या होत्या. दरम्यान, अनेक एटीएम सेंटर दुपारपर्यंत बंद असल्याने भाविकांची गैरसोय झाली. पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याचा मोठा परिणाम यात्रेवर झाल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. 

कार्तिकीची वैशिष्ट्ये 

* कार्तिकीसाठी सुमारे चार ते पाच लाख भाविक दाखल 

* चंद्रभागेत अपुऱ्या पाण्यामुळे भाविकांची कुचंबणा 

* पाचशे, हजाराच्या नोटा रद्द झाल्याने यात्रेवर परिणाम 

* गतवर्षीपेक्षा यंदाही भाविकांच्या संख्येत घट 

Web Title: Around four million pilgrims participated in the ceremony Kartiki