मुंबई, ठाणे, कोकणमुळे महायुतीला मिळालं बळ! Election Result 2019

ShivSena-BJP
ShivSena-BJP

राज्यातील ग्रामीण भागात शिवसेना- भाजप युतीसमोर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने जोरदार आव्हान निर्माण केले असताना, भाजप- शिवसेना महायुतीने मात्र शहरी भागामध्ये घवघवीत यश मिळवलेले आहे. राजधानी मुंबई, ठाणे आणि कोकण या भागात शिवसेना- भाजपने मुसंडी मारल्याने बहुमताचा आकडा गाठणे शक्‍य झाले.

मुंबईतील 36, ठाणे- पालघरमधील 24, आणि रायगडमधील 7 अशा विधानसभेच्या 57 मतदारसंघांत काँग्रेस- राष्ट्रवादीचे पानीपत झाले आहे. मुंबईमध्ये चार जागांवर आघाडीला यश मिळाले असून, 32 जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईतील काही जागांवर ताकदीने उतरलेली असतानाही त्याचा लाभ आघाडीला झालेला नाही. काँग्रेसचे नसीमखान, चंद्रकांत हांडोरे यांना मनसे उमेदवारांमुळे फटका बसलाय.

दरम्यान, चार मतदारसंघांत शिवसेना बंडखोर उभे असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला उठवता आला नाही. ठाकरे कुटुंबीयांचे मतदान ज्या मतदारसंघात आहे, तो वांद्रे पूर्व मतदारसंघ काँग्रेसने जिंकलाय. येथे विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचे मुंबईचे महापौर महाडेश्‍वर यांच्याविरोधात बंड केले होते. हे काही अपवाद वगळता मुंबईमध्ये महायुतीचा बोलबाला राहिला.

ठाणे-पालघर जिल्ह्यात महायुतीने एकहाती यश संपादले असून, मुंब्रा- कळवा ही जितेंद्र आव्हाड यांची जागा वगळता महाआघाडीला धूळ चारली आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याणमधील शिवसेना- भाजप युतीमध्ये बेबनाव झाला होता, त्याचा फायदा आघाडीला उठवता आला नाही. आघाडीच्या पाठिंब्याने मनसेला कल्याण ग्रामीणची एकमेव जागा मिळाली. 

मुंबईत शिवसेना- भाजप युतीला आघाडीचे तसे आव्हान फारसे नव्हते. मुंबईत शिवसेना 19, तर भाजप 17 जागा लढवत होते, तर आघाडीतील काँग्रेस 29, राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागा लढवत होते. एक जागा समाजवादी पक्षाला सोडली होती. यातच काँग्रेसचे उमेदवार तुलनेने नवखे होते.

तसेच, मुंबई काँग्रेसमध्ये आचारसंहिता जाहीर झाल्यावरदेखील संघर्ष उफाळून आलेला होता. माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्याऐवजी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना अध्यक्ष केले होते, तर माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी शांत राहणे पसंत केले होते. त्यामुळे मुंबई आघाडी लढतीत नव्हती, असेच चित्र निर्माण झाले होते.

यातच मुंबईत महायुतीची शेवटी संयुक्‍त सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. मुंबई, ठाणे, कोकण या पट्ट्यातील मतदारांचा विचार करून भाजपने खारघर येथेही मोदींची सभा घेतली होती. यामुळे भाजप- शिवसेना युतीला या पट्ट्यात घवघवीत यश मिळाले. मुंबईप्रमाणे ठाणे- पालघर आणि रायगडमध्येदेखील शिवसेना- भाजपला यश मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com