मनोरुग्णांना आपलंस करणारा मानवसेवा प्रकल्प article Psychopath women sakal social foundation social activity social for action | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Psychopath women

मनोरुग्णांना आपलंस करणारा मानवसेवा प्रकल्प

‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी ऑनलाइन, डिजिटल वेबसाइट स्वरूपात प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या माध्यमातून दानशूर व्यक्ती, संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) स्वीकारणाऱ्या आस्थापनांना एकत्र आणून शालेय विद्यार्थी, शाळा व ग्रामीण भागातील नागरिकांशी निगडित असलेल्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच, महाराष्ट्रात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी अभियान राबविण्यात येते. या मार्फत राज्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या १६ स्वयंसेवी संस्थांचे अभियान पूर्ण केले आहे. तसेच, क्राउड फंडिंगद्वारे जमा झालेला निधी त्या-त्या संस्थांना वर्ग केला आहे.

गीता व मायाला मिळाला आधार

एक २२ वर्षांची मानसिक संतुलन बिघडलेली, चेहऱ्यावर जखमा व वेदनेने विव्हळणारी तरुणी गीता (नाव बदलले आहे.) अरणगाव (मेहराबाद) परिसरात रस्त्यावर नग्नावस्थेत फिरत असल्याचे ग्रामस्थांना समजले. तिच्या विकलांगतेचा काही विकृत नराधमांनी गैरफायदा घेत दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला होता. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी या तरुणीला संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात तत्काळ दाखल केले.

१९ वर्षीय माया (नाव बदलले आहे) लहान भाऊ आणि आईसह राहत होती. कौटुंबिक परिस्थिती तशी चांगली, पण अचानक नियतीने घाला घातला आणि वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आईने कुटुंबाला सावरले. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी माया घराबाहेर पडली. मात्र, तिच्या परिस्थितीचा काही नराधमांनी गैरफायदा घेत तिला मुंबई आणि अनेक शहरांत नेऊन अत्याचार केले. माया मानसिक आजाराला बळी पडली. तिचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडल्याने ती रस्त्यावरील किळसवाणं आयुष्य जगू लागली. या युवतीची माहिती संस्थेच्या स्वयंसेवकांना समजल्यानंतर त्यांनी तिला मानवसेवा प्रकल्पात दाखल केले.

गीता व माया अशा रस्त्यांवरील शेकडो निराधार व बेघर मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्पात दाखल करून मायेचा आधार देण्याबरोबरच त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. रस्त्यावरील बेघर व पीडित मनोरुग्णांना मायेने जवळ करायचे, त्यांची शुश्रूषा करायची आणि या मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मानवसेवा प्रकल्प रात्रंदिवस करीत आहे.

मानवसेवा प्रकल्पाची सुरवात...

दिलीप गुंजाळ नावाचा तरुण शिर्डीला जात होता. प्रवासादरम्यान राहुरी बस स्थानक परिसरात मन सुन्न करणारे चित्र त्याला दिसले. विस्कटलेले केस आणि फाटके कपडे असलेली एक मनोरुग्ण महिला दोन मुलांसह बसली होती. गुंजाळ त्या महिलेच्या मुलांजवळ गेले. एका मुलाच्या कानाला मोठी दुखापत झाली होती. जखमेतून पाण्याबरोबर किडेही बाहेर येत होते. हे सारं पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले. त्या महिलेला तिच्या मुलांसह अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात त्यांनी भरती केले.

नगरला पोहोचल्यानंतर गुंजाळ यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. जिल्ह्यात निराधार व मानसिक रुग्णांसाठी प्रभावी व्यवस्था उभी राहण्यासाठी प्रत्यक्षात काय करता येईल, याबाबत त्यांनी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू केले. शेवटी अनेक संकटांचा सामना करत २००६ मध्ये अत्यंत दुर्लक्षित घटकांच्या पुनर्वसनासाठी श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळ या संस्थेची त्यांनी स्थापना केली.

पुनर्वसनाचे सामाजिक कार्य

ज्यांचं कुणीच नसतं, अशा लोकांच्या उपचार व पुनर्वसनासाठी पुढे सरसावणं हीच खरी मानवसेवा! या उक्तीप्रमाणे रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर, निराधार व पीडित मनोरुग्ण माता-भगिनी आणि माणसांना पोलिसांच्या मदतीने आणायचं, त्यांची स्वच्छता करून त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर योग्य उपचार व समुपदेशन करून पुनर्वसन करायचे, असे सेवाकार्य श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेच्या नगर जिल्ह्यातील अरणगाव (मेहराबाद) येथील मानवसेवा प्रकल्पात केले जात आहे.

२,५०० जणांवर उपचार

संस्थेने सुरूवातीला भाड्याच्या जागेत व नंतर स्वतःच्या हक्काच्या जागेत आतापर्यंत २,५०० निराधार मानसिक विकलांग व्यक्तींवर उपचार केले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन पुनर्वसन केले आहे. संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात सध्या ४५ बेघर, निराधार व मानसिक विकलांग व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय संस्थेचा मानवसेवा प्रकल्प सुरू आहे. संस्थेला मानवसेवा प्रकल्पात बेघर, निराधार व मानसिक विकलांग रुग्णांसाठी १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे करायचे आहे.

शासकीय अनुदान नाही

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचालित मानवसेवा प्रकल्पाला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्थांच्या मदतीमुळे संस्था चालते. संस्थेचा दिवसाला होणारा खर्च खूप मोठा आहे. त्यातही बेघर, निराधार व मानसिक विकलांग रुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषधोपचारांचा खर्च मोठा आहे. प्रकल्पाचा दैनंदिन भोजनाचा खर्च पाच हजार रुपये आहे. तसेच, एका व्यक्तीच्या औषधोपचारांचा एका महिन्याचा खर्च तीन हजार रुपये आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची गरज आहे.

अशी करा मदत...

समाजातील दानशूर व्यक्ती, औद्योगिक कंपन्या, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या व विविध क्षेत्रातील कंपन्यांना ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध उपक्रमांसाठी मदत करता येईल. मदत करण्यासाठी https://socialforaction.com/ ही लिंक ओपन करून, सोशल फॉर अॅक्शन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची व संस्थांच्या अभियानाची माहिती घेऊन, डोनेट नाऊ या बटनावर क्लिक करून थेट ‘सोशल फॉर अॅक्शन’ या वेबसाईटद्वारे ऑनलाइन देणगी देता येईल. देणगी देणाऱ्यास पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

किंवा

खालील बँक खात्यात ऑनलाइन देणगी पाठवू शकता. ऑनलाइन देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सॲप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.

Name - Social For Action

Bank A/C Number - ०४५९१०४०००११७८५२

Name of Bank - IDBI bank, Laxmi Road ,Pune.

IFSC Code - IBKL००००४५९

टॅग्स :womenarticle