भाजपच्या गडात प्रथमच ‘जय विदर्भ’ नाही!

श्रीमंत माने
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत.

स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत.

महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही पहिलीच निवडणूक असावी, की विदर्भात स्वतंत्र राज्यनिर्मितीच्या मुद्यावर सामसूम आहे. एरव्ही प्रत्येक निवडणुकीत क्षीण का होईना, पण ‘जय विदर्भ’चा नारा घुमतो. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींच्या रूपाने राज्याची सगळी सत्ताकेंद्रे विदर्भात आहेत आणि सत्तास्थानी बसलेल्या नेत्यांनी राज्यनिर्मितीचा मुद्दा गुंडाळून ठेवला आहे. त्याऐवजी गाजावाजा सुरू आहे तो विदर्भाच्या विकासाचा. 

विदर्भ हा तसा नेहमीच राष्ट्रीय पक्षांना, काँग्रेस आणि भाजपला आलटून पालटून कौल देणारा प्रदेश. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या भागात मिळणारा प्रतिसाद तसा मर्यादितच. खास करून वऱ्हाडात हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेचे खासदार निवडून येत असले तरी बहुतेक वेळा जितके खासदार तितकेच आमदार अशी स्थिती. राष्ट्रवादीचाही प्रभाव काही घराण्यांपुरताच मर्यादित. गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाने भाजपला ६२ पैकी तब्बल ४४ जागा दिल्या. काँग्रेसला दहा, तर शिवसेनेला चार, अन्‌ राष्ट्रवादीला अवघी एक. याही वेळी भाजपची मोठी मदार विदर्भावरच असेल, अन्‌ गलितगात्र काँग्रेसलाही आशादेखील याच प्रदेशातून असेल. 

विदर्भाचे मतदार स्वतंत्र राज्याच्या बाजूने नसल्याच्या दाव्यात अजिबात दम नाही. या मुद्यावर अनेकदा मतदारांनी स्पष्ट कौल दिलाय. पहिला प्रसंग १९६२ च्या नागपूर लोकसभा निवडणुकीचा. संयुक्‍त महाराष्ट्राची प्रचंड हवा असताना नागपूरकरांनी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्याविरोधात विदर्भवादी बापूजी अणे यांना निवडून दिले होते. १९७१ च्या निवडणुकीत वीर जांबुवंतराव धोटे यांनी फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर नागपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. १९७७ मध्ये चंद्रपूरमधून राजे विश्‍वेश्‍वर राव याच मुद्यावर निवडून आले. वसंत साठे, एन. के. पी. साळवे, प्रफुल्ल पटेल, दत्ता मेघे, रणजित देशमुख आदी काँग्रेसच्या नेत्यांनी अधूनमधून विदर्भाचा मुद्दा उचलून धरला. त्याचा त्या त्या वेळी त्यांना फायदाही झाला. 

पश्‍चिम विदर्भ म्हणजे वऱ्हाड प्रांत कधीच स्वतंत्र राज्यासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते; परंतु जांबुवंतराव धोटे यांच्याशिवाय डॉ. जगन्नाथ ढोणे, गजानन दाळू गुरुजी, सुबोध सावजी, किसनराव गवळी, डॉ. राजेंद्र गोडे आदींनी या प्रांतातही हा मुद्दा ताकदीने उचलला. भारतीय जनता पक्षाने भुवनेश्‍वर राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव केला. त्याआधी १९१२ च्या बांकीपूर अधिवेशनात काँग्रेसनेही तसा ठराव केला होता. रावबहादूर रंगनाथ मुधोळकर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतर भाजप नेहमीच छोट्या राज्यांचा समर्थक राहिला. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांच्या निर्मितीचे श्रेय भाजपलाच जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय; तर फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना दोघांनीही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर येताच स्वतंत्र राज्य निर्माण केले जाईल, असे आश्‍वासन डॉ. आशीष देशमुख यांच्या आंदोलनावेळी दिले होते; पण आता स्वतंत्र राज्याचा मुद्दा चर्चेतही नाही. 

महाराष्ट्राच्या सत्तेत विदर्भाचा ठळक वाटा 
आतापर्यंतचे मुख्यमंत्री - मारोतराव ऊर्फ दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, देवेंद्र फडणवीस.
आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री - मारोतराव कन्नमवार, नासिकराव तिरपुडे.

दृष्टिक्षेपात विदर्भ आणि वऱ्हाड

 • १९३६ - मध्य प्रांत आणि वऱ्हाड राज्याची स्थापना. 
 • १९४१ - मधील जनगणनेनुसार लोकसंख्या - १,६८,१३,५८४.
 • नागपूर, वऱ्हाड, जबलपूर, नर्मदा, छत्तीसगड महसूल विभागांमध्ये २२ जिल्ह्यांचे मिळून राज्य.
 • ८ ऑगस्ट १९४६ - पश्‍चिम महाराष्ट्र आणि सीपी अँड बेरारमधील नेत्यांमध्ये समान संधीबाबत अकोला करार.  
 • १९५० - मध्य प्रदेश राज्याची स्थापना, विदर्भ प्रांत मुंबई राज्यात. 
 • २८ सप्टेंबर १९५३ - नागपूर करार. यशवंतराव चव्हाण, डॉ. आबासाहेब खेडकर, आर. के. पाटील यांच्या त्यावर सह्या.
 • २९ डिसेंबर १९५३ - फजल अली यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुनर्गठन आयोग. 
 • फजल अली कमिशनपुढे बापूजी अणे आणि ब्रिजलाल बियाणी यांची स्वतंत्र राज्याची जोरदार मागणी.
 • १९५६ - कमिशन स्वतंत्र राज्यासाठी अनुकूल असतानाही द्विभाषिक मुंबई राज्यात विदर्भाचा समावेश.
 • शंभर वर्षे राजधानी असूनही तो दर्जा गमावलेले नागपूर हे देशातील एकमेव शहर.
 • ३९६ - आमदारांचे सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ, मराठवाडा मिळून महाकाय मुंबई राज्य.
 • संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीमुळे काँग्रेसच्या जागा घटल्या. विदर्भात मात्र काँग्रेसचा दबदबा.
 • मारोतराव कन्नमवार यांच्या नेतृत्वात विदर्भाच्या आमदारांनी संयुक्‍त महाराष्ट्र मान्य केला. 
 • १ मे १९६० - महाराष्ट्र राज्याची स्थापना. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री, तर कन्नमवार उपमुख्यमंत्री.
 • २० नोव्हेंबर १९६२ - मारोतराव उर्फ दादासाहेब कन्नमवार मुख्यमंत्री, एक वर्ष चार दिवसांत त्यांचा मृत्यू. वसंतराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रिपद.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article shrimant mane on Independent Vidarbha