ढगच नाहीत अन् कसला कृत्रिम पाऊस पाडता!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

राज्यात एप्रिल महिन्यात हवामानाचा अंदाज दिल्यानंतरही दप्तर दिरंगाई व निर्णयाला विलंब करीत राज्य सरकारने २२ जुलैनंतर मराठवाडा व अन्य भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक - राज्यात एप्रिल महिन्यात हवामानाचा अंदाज दिल्यानंतरही दप्तर दिरंगाई व निर्णयाला विलंब करीत राज्य सरकारने २२ जुलैनंतर मराठवाडा व अन्य भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम प्रयोगाने पाऊस किती झाला, त्याची यशस्वीता किती आहे, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देणारी यंत्रणाच राज्याकडे नसल्याची बाब समोर येत आहे.

राज्याच्या हवामान विभागाने एप्रिल महिन्यातच विभागनिहाय पावसाचा अंदाज वर्तविला होता. राज्यातील काही भाग वगळता जून व १७ जुलैअखेर पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्याने पावसाच्या भरवशावर काही ठिकाणी पेरणी केली असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई कायम असून, भर पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाचा अंदाज एप्रिल महिन्यात समजल्यानंतरही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यास थोडा विलंब केला आहे. जूनच्या मध्यानंतर हा प्रयोग करणे अपेक्षित असताना मात्र जुलै अर्ध्यावर गेल्यानंतर हा प्रयोग केला जाणार आहे. 

पुरेशा यंत्रणेचा अभाव
यापूर्वी हा प्रयोग यशस्वी झाला की अयशस्वी, हे सांगणे कठीण असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. कारण आपल्या राज्यात पावसाची नोंद ही २४ तासांनंतर तीही ठरावीक ठिकाणी होते. असे प्रयोग करावयाचे झाल्यास किमान पाच किलोमीटर अंतरावर पर्जन्यमापक असणे व त्याची नोंद मध्यवर्ती यंत्रणेकडे दर तासाला होणे आवश्‍यक आहे. मात्र, तशी यंत्रणा राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात किंवा तालुक्‍यात नाही. रसायनाची फवारणी झाल्यावर वाऱ्यासोबत वाहून जाणारे ढग हे ३० ते ४० किलोमीटर अंतरावर गेलेले असतात. जमिनीवर पडलेल्या पावसाची नोंदही घेतली जाते. मग संबंधित भागात झालेला पाऊस हा कृत्रिम की नैसर्गिक, असा प्रश्‍न निर्माण होतो.

राज्याचा पावसाचा अंदाज घेऊनच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.  जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस न झाल्याने तातडीने सरकारने प्रयोगाचा निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली आहे. २२ जुलैनंतर हे प्रयोग केले जातील. निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रयोगासाठी आवश्‍यक असणाऱ्या केंद्रांच्या परवानगीचे काम सुरू आहे.
- किशोरराजे निंबाळकर, सचिव, मदत व पुनर्वसन विभाग

सोलापूर, औरंगाबादेत मंगळवारी प्रयोग
मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग तसेच मराठवाड्यात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन या भागात मंगळवारी (ता. २३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली. सोलापूर, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एकाचवेळी हा प्रयोग होईल, असे सांगण्यात आले. पावसाचा खंड लक्षात घेऊन सरकारने या भागात कृत्रिम पावसाचा निर्णय याआधीच घेतला होता. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर, औरंगाबाद आणि शेगाव या तिन्ही भागांत कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या कंपन्यांची विमाने आकाशात झेपावून ढगांवर फवारणी करतील. हा पाऊस तलाव क्षेत्रात व्हावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial Rain Cloud Empty