कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे 'काउंट डाउन'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रदेशातील कृत्रिम पावसाच्या भारतातील पहिल्या शास्त्रशुद्ध प्रयोगाला पुढील दोन आठवड्यांत सुरवात होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक विमाने पुढील आठवड्यात पुण्यात दाखल होत असून, रडारसह सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रदेशातील कृत्रिम पावसाच्या भारतातील पहिल्या शास्त्रशुद्ध प्रयोगाला पुढील दोन आठवड्यांत सुरवात होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक विमाने पुढील आठवड्यात पुण्यात दाखल होत असून, रडारसह सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.

या प्रयोगाद्वारे दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या सरी बरसतील, असा विश्‍वास हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने कृत्रिम पावसाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पुण्यातील "भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थे'मधील (आयआयटीएम) हवामान शास्त्रज्ञ या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. तीन वर्षांच्या या प्रकल्पातील हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी सोलापूरमधील ढगांचे प्रमाण आणि पावसाच्या पद्धतीचा अभ्यास केला. त्या आधारावर या वर्षी प्रत्यक्ष कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येत आहे.

नैसर्गिक पावसासाठी ढगांमधील बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि त्याचा वेग असे विविध घटक आवश्‍यक असतात. त्यातील असमतोलामुळे पावसाने हुलकावणी दिल्यावर कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो.

...असा पाडणार कृत्रिम पाऊस
काळे ढग असूनही नैसर्गिक पाऊस पडत नसेल त्या वेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो. त्यासाठी सोलापूरच्या दोनशे किलोमीटर परिघातील ढगांचे अचूक विश्‍लेषण करणारे रडार उभारण्यात आले आहे. या रडारच्या माध्यमातून नेमक्‍या कोणत्या ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडता येईल, हे निश्‍चित केले जाईल. वातावरणातील योग्य परिस्थिती पाहून विशिष्ट विमानातून काळ्या ढगांच्या तळाला सोडिअम क्‍लोराईड (मीठ) किंवा कॅल्शिअम क्‍लोराईड फवारले जाणार आहे. हे मीठ ढगांमधील बाष्प शोषण्याचे काम करते. त्यामुळे मिठाच्या कणांभोवती ढगातील बाष्प जमा होते आणि त्याचा आकार वाढला की त्याचे रूपांतर पाण्याच्या थेंबांत होऊन पाऊस पडतो.

असा मोजणार कृत्रिम पाऊस
विमानांमधून मीठ फवारणी केल्यानंतर निवडलेल्या ढगांतून निर्माण झालेला पावसाचा थेंब जमिनीपर्यंत येणे महत्त्वाचे असते. रडारच्या माध्यमातून यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पडलेला कृत्रिम पाऊस मोजण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दोनशे किलोमीटरच्या परिघात 120 ठिकाणी पाऊस मोजणारी उपकरणे बसविण्यात आली आहेत.

ढगांमधील बदलाची निरीक्षणे टिपणार
निवडलेल्या ढगांमध्ये मीठ फवारण्यासाठीच्या विमानाबरोबर आणखी एक विमान असेल. मीठ फवारताना ढगांमध्ये होणारे बदल हे विमान टिपणार आहे.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, लवकरच तो सुरू करण्यात येईल. कृत्रिम पावसाचा हा प्रयोग यंदाच्या पावसाळ्यात 120 दिवस सुरू राहणार आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला देशातील हा पहिला प्रयोग आहे.
- डॉ. तारा प्रभाकरन, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ, आयआयटीएम

Web Title: artificial rain experiment count down