राज्यात आता कृत्रिम धारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

औरंगाबाद, मुंबई व सोलापूर या तीन ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे रडार बसवण्यात आले आहे. कृत्रिम पावसासाठी राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. २० ते २५ जुलै दरम्यान राज्यभरात ढगाळ वातावरणाची शक्‍यता असल्याने या कालावधीत कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
- श्रीरंग घोलप, अतिरिक्‍त सचिव, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई

सोलापूर - पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा काळ लोटला तरीही कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित भागात वरुणराजाने दडी मारली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात २० ते २५ जुलै दरम्यान कृत्रिम पावसाचा या वर्षीचा पहिला प्रयोग करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. त्यामुळे सोलापूर, औरंगाबाद व मुंबई या रडार केंद्राच्या २०० किलोमीटर परिसराला याचा फायदा होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.

राज्यात सरासरीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी राहील असा हवामान खात्याने अंदाज व्यक्‍त केला असतानाही सुरवातीच्या काळात राज्य सरकारने कृत्रिम पावसासाठी हालचाली केल्या नाहीत. तत्पूर्वी, अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी आणि कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी लागणाऱ्या परवानग्याही वेळेवर मिळाल्या नसल्याने विलंब लागल्याची माहिती मदत व पुनवर्सन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मागील दीड महिन्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, औरंगाबाद यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडल्याने बळिराजाचा चिंता वाढल्याचे चित्र आहे, त्यामुळे २० जुलै ते सप्टेंबरअखेर यादरम्यान कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित जिल्ह्यात विमाने मुक्‍कामी पाठवण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial Rain in maharashtra Water Shortage