आषाढी वारीसाठी साडेतीन हजार एसटी गाड्या

नरेश हाळणोर
मंगळवार, 10 जुलै 2018

देहू-आंळदीसह अन्य ठिकाणांसाठीही विशेष बसगाड्या

देहू-आंळदीसह अन्य ठिकाणांसाठीही विशेष बसगाड्या
नाशिक - पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलै या कालावधीसाठी महामंडळाने नियोजन केले आहे. भाविकांना देहू- आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची तत्परताही महामंडळाने दाखवली आहे.

महसूलवृद्धी आणि खासगी वाहतुकीला आळा घालणे हे उद्देश या नियोजनामागे आहेत. पंढरपूरच्या वारीनिमित्त नुकतीच महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या उपस्थितीत भोसरीच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत बैठक झाली. बैठकीला राज्यातील विभाग नियंत्रकांसह वाहतूक नियंत्रण समितीचे अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

विभागनिहाय बसगाड्यांची उपलब्धता    विभाग
1 हजार 70 - औरंगाबाद
284 - मुंबई
130 - नागपूर
1 हजार 7 - पुणे
750 - नाशिक
540 - अमरावती

वारकऱ्यांसाठीच्या सुविधा
बसगाड्यांचे वेळापत्रक विभागासह आगारांच्या बसस्थानकावर लावणार. परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण व्यवस्थेसह संगणकीय आगाऊ आरक्षणही 24 तास उपलब्ध असणार.

भाविकांच्या स्वागतासह सुरक्षिततेसाठी आगारात सतत उद्‌घोषातून सूचना दिल्या जातील.

पंढरपूरमधील तीनही बसस्थानकांवर फोन, झुणका भाकर स्टॉल, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था असणार आहे. रुग्णवाहिकाही सज्ज असतील.

Web Title: Ashadhi Wari 3500 ST