'जे कधी घराबाहेर पडले नाहीत, ते आता कोलकत्याला जाऊ लागले'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

"ईव्हीएम'ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डावे पक्ष एकत्रित येत असून, त्या विरोधात 21 ऑगस्ट रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली गेली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार बोलत होते. 

मुंबई : जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकत्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते "ईव्हीएम'बाबत बोलत आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी निवडणूकच लढविली नाही त्यांनी "ईव्हीएम'वर बोलावे यातच सगळे आल्याचा टोला शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. आधी निवडणूक लढवावी; मगच "ईव्हीएम'बाबत बोलावे, असे आव्हानच त्यांनी दिले. 

"ईव्हीएम'ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डावे पक्ष एकत्रित येत असून, त्या विरोधात 21 ऑगस्ट रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली गेली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार बोलत होते. 

निवडणूक आयोगाला घटनात्मक अधिकार असून, निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात की "ईव्हीएम'वर, हे आयोगानेच ठरवायचे आहे. घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगाबाबत अशाप्रकारे जनमानसात संभ्रम निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. राज ठाकरे आणि विरोधी पक्षांनी "ईव्हीएम'वर टीका करत आंदोलन सुरू केले आहे. यावर शेलार यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषद घेऊन जे नेते "ईव्हीएम'च्या विरोधात बोलत आहेत, त्यापैकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे "ईव्हीएम'द्वारेच निवडून आले आहेत. त्यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच "ईव्हीएम'बाबत बोलावे, असे आव्हानच त्यांनी दिले आहे. 

जेव्हा हे सगळे निवडून येतात, तेव्हा "ईव्हीएम' चांगले आणि पराभव झाला की "ईव्हीएम'वर खापर फोडायचे. हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा आहे. जनतेने जो कौल दिला आहे त्याचाही हे अपमान करीत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या सल्ल्याप्रमाणे या सर्वांनी आत्मचिंतन करायची गरज असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Shelar attacks Raj Thackeray in EVM