देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, जनतेच्या पदरी दारिद्य्र

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे जनतेच्या पदरी दारिद्य्र आले आहे. सरकारच्या लोकविरोधी निर्णयाविरोधात जानेवारी महिन्यात कॉंग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे जनतेच्या पदरी दारिद्य्र आले आहे. सरकारच्या लोकविरोधी निर्णयाविरोधात जानेवारी महिन्यात कॉंग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, सरकारच्या या अन्यायपूर्ण निर्णयाविरोधात कॉंग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे. 2 जानेवारीला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन लोकांमध्ये जनजागृती, 8 जानेवारीला घंटानाद आंदोलन करणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपली आहे, त्यामुळे बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध सरकारने तत्काळ मागे घ्यावेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना सहारा समूहाकडून 40 कोटी आणि बिर्ला समूहाकडून 25 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप कॉंग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, असे चव्हाण म्हणाले. भाजपचे अध्यक्ष अमित शाह संचालक असलेल्या बॅंकेत नोटाबंदीनंतर काही तासांत 500 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या. सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या बॅंकेच्या गाडीतून 91 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या, तर वैद्यनाथ बॅंकेच्या गाडीतून 10 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या; पण सरकार याप्रकरणी काहीच कारवाई करत नाही. या सर्वांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी केली.

नागरिकांनी बॅंकेत जमा केलेल्या पैशांवर 18 टक्के दराने व्याज द्यावे, ऑनलाइन व्यवहारांवरील कमिशन बंद करावे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून आधारभूत किमतीवर 20 टक्के बोनस, तसेच दारिद्य्र रेषेखालील प्रत्येक महिलेच्या खात्यात सरकारने तातडीने 25 हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: ashok chavan conference in mumbai