माजी मुख्यमंत्री आता पुन्हा मंत्रीपदी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

आताही भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत असताना त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.

नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेडचे भूमिपुत्र आणि भोकरचे आमदार कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या नव्या सरकारमध्ये आज पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाले. सोमवारी (ता. ३०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.  

महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना नांदेडचे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री या नात्याने नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्याचबरोबर राजधानी मुंबईवर 26 - 11 चा हल्ला (2008) झालेला असताना त्यांनी अतिशय अडचणीच्या काळात राज्य चालवले. पुन्हा 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद मिळवले.

पार्श्वभूमी

अशोक चव्हाण यांचा जन्म ता. 28 आक्टोंबर 1958 मध्ये मुंबईत झाला. वडील शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री ते गृहमंत्री अशी राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी महत्वाची पदे भूषवली असल्यामुळे लहानपणापासून अशोकरावांनी राजकारण जवळून पाहिले. त्यांनी मुंबईत बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतले नंतर एमबीए केले. त्यानंतर अशोक चव्हाण यांची 1984 मध्ये महाराष्‍ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 

1987 मध्ये पहिली लोकसभेची निवडणुक त्यांनी लढविली आणि त्यात ते विजयी होऊन खासदार झाले. त्यानंतर 1989 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात आले आणि 1992 मध्ये विधान परिषदेचे आमदार झाले. मार्च 1993 मध्ये मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. 

Image result for ashok chavan family

त्यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची मुदखेडमधून निवडणुक लढविली आणि ते आमदार झाले. त्याचबरोबर महसूलमंत्रीही झाले. जानेवारी 2003 मध्ये परिवहन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री झाले. 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत मुदखेडमधून पुन्हा आमदार झाले आणि मंत्रीमंडळात उद्योगमंत्री झाले.

कारकीर्द

अशोक चव्हाण यांना ज्येष्ठ नेते शरद पवार, विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रीमंडळात महसूल, उद्योग, परिवहन, सांस्कृतिक कार्य, नगरविकास आदी खात्याची मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

Image result for ashok chavan shankarrao chavan

मुंबईवरील हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून ता. आठ डिसेंबर 2008 रोजी अशोक चव्हाण यांनी शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये निवडणुका झाल्या आणि पुन्हा अशोकराव भोकर विधानसभा मतदारसंघामधून विजयी झाले. 

आदर्श प्रकरणात राजीनामा

15 आक्टोंबर 2009 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, एक वर्षानंतर ता. नऊ नोव्हेंबर 2009 रोजी ‘आदर्श’ प्रकरणात आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.

2014 मध्ये अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभेची निवडणुक लढविली आणि ते मोदी लाटेतही खासदार झाले. त्यानंतर त्यांच्यावर कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 

आक्रमक शिवसैनिक ते मंत्री

आक्टोंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली आणि तब्बल 97 हजार एवढ्या मताधिक्याने ते विजयी झाले. 2014 नंतर पुन्हा एकदा 2019 मध्ये त्यांचा राज्याच्या विधीमंडळात आमदार म्हणून प्रवेश झाला.

आताही भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत असताना त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan Takes Oath As A Cabinet Minister Of Maharashtra Nanded Breaking