हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली; नागपूरात तयारीला वेग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

सध्या सत्ताधारी तिन्ही पक्षनेत्यांमध्ये याबाबत बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये निर्णय न झाल्यास मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर होईल, अशी शक्यताही काहीजणांनी व्यक्त केली आहे.  

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शनिवारी (ता.30) बहुमत जिंकले. आणि विश्वासदर्शक ठरावाबाबत होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

बहुमत जिंकल्यानंतर महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या नव्या महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचे नक्की झाले आहे. त्यानंतर या नव्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन लवकरच होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दृष्टीने तयारीही सुरू झाल्याचे दिसून आले.   

- सभात्यागासाठी भाजपला निव्वळ निमित्त हवं होतं

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 16 डिसेंबरला या अधिवेशनाचे सत्र सुरू होण्याची शक्‍यता असून ते अधिवेशन 21 तारखेपर्यंत चालणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे होणारे हे अधिवेशन फक्त सहा दिवसांचेच होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

विधिमंडळ अध्यक्षांची निवड आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीनंतर हिवाळी अधिवेशनावर अखेरचे शिक्कामोर्तब होईल.  सध्या सत्ताधारी तिन्ही पक्षनेत्यांमध्ये याबाबत बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये निर्णय न झाल्यास मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर होईल, अशी शक्यताही काहीजणांनी व्यक्त केली आहे.  

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'

विभागीय आयुक्त म्हणाले...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी घेतलेल्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाची माहिती दिली होती. अधिवेशनाच्या तयारीसाठी  विधीमंडळ सचिवालयाला तयारी करण्यासाठी किमान 15 ते 20 दिवस लागतात. त्यामुळे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही होण्याची शक्यता संजीवकुमार यांनी वर्तविली आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे 16 ते 21 डिसेंबर या दरम्यानच हे अधिवेशन होण्याचा अंदाज आहे. 

- अजित पवार सभागृहातच भडकले; जितेंद्र आव्हाडांची 'सिंपल मिस्टेक'

नागपूरात लगबग

नव्या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाची तयारी नागपूरात सुरू झाली आहे. मंडप टाकण्यासाठी बांबू महिनाभरापासून येऊन पडले आहेत. तसेच येथे नवीन इमारतही उभारण्यात येत असून त्याचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assembly winter session to be held in Nagpur between 16 to 21st December