घातपात टळला; हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

दाभोलकर, पानसरे हत्येशी संबंध?
काही व्यक्ती घातपास घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक तपासानंतर एटीएसचे पथक नालासोपारा येथे गेले. ते तीन दिवस तेथे तळ ठोकून होते. त्यांचे लक्ष्य कोण होते? नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी त्यांचा संबध आहे का, या दृष्टीनेही एटीएस तपास करत आहे. स्वातंत्र्यदिनी ते घातपास घडवण्याच्या तयारीत होते का, याबाबतची चौकशी केली जाणार आहे. जप्त करण्यात आलेले बॉंब कोणी बनवले, ते कुठे ठेवण्यात येणार होते, त्या तिघांवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली होती, याचाही तपास होणार आहे. याप्रकरणी एटीएसने 15 जणांची चौकशीही केली आहे. तपासासाठी एटीएस सायबर गुन्हे शाखेचीही मदत घेणार आहेत.

मुंबई - राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तीन सदस्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज अटक केली. वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर अशी त्यांची नावे आहेत. राऊत आणि कळसकरला मुंबईनजीकच्या नालासोपारा येथून; तर गोंधळेकरला पुण्यातून अटक करण्यात आली.

एटीएसच्या पथकाने राऊतच्या घरी टाकलेल्या छाप्यादरम्यान कमी तीव्रतेचे 20 गावठी बॉंब, जिलेटीनच्या दोन काड्या, 22 नॉन इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर्स, विषाच्या दोन बाटल्यांसह बॉंब बनवण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली. तिघांनाही शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यांच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता आहे.

मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर येथे बॉंबस्फोट घडवून त्यांचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैभव राऊत हा नालासोपाऱ्यात "हिंदू गोवंश रक्षा समिती' ही संस्था चालवत होता, तसेच सोशल मीडियावरील त्याच्या खात्यावर तो "सनातन' संस्थेशी संबंधित असल्याचा उल्लेख असल्याची माहिती पुढे आली आहे. "सनातन' संस्थेने हा दावा फेटाळला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार राऊत हा इस्टेट एजंट आहे, तर कळसकर खासगी कंपनीत कामाला आहे. मूळचा सातारचा असलेला सुधन्वा गोंधळेकर एका संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम केला आहे, त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे.

काही व्यक्ती प्रमुख महानगरांमध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे या पथकाने गुरुवारी रात्री नालासोपारा येथील भंडारआळीत राहणाऱ्या राऊतच्या दुकानावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. तेथून 20 गावठी बॉंब, जिलेटीनच्या दोन काडया, 22 नॉन इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर्स, सेफ्टी फ्युज वायर, तीन स्विच, पेपरमध्ये असलेली पावडर, बॅटरी, एक्‍सोब्लेड, कटर, सोल्युशन, सहा ट्रान्झिस्टर, वायरचे तुकडे, एक सर्किट जप्त करण्यात आले. या पथकाने नंतर कळसकरच्या घरातून काही कागदपत्रे जप्त केली. स्फोटासाठी लागणाऱ्या वस्तू कशा जोडाव्यात याचे नकाशेही त्यात होते. राऊत आणि कळसकरच्या चौकशीतून सुधन्वाचे नाव पुढे आले. एटीएसच्या पथकाने शुक्रवारी सकाळी त्याला पुण्यातून ताब्यात घेतले.

सामग्रीतून 50 बॉंब बनले असते
बॉंब बनवताना सहसा विष वापरले जात नाही; पण राऊत याच्या दुकानात विषाच्या दोन बाटल्या सापडल्या. छाप्यादरम्यान जप्त केलेल्या सामग्रीतून आणखी 50 बॉंब बनवता आले असते. तेथून जप्त केलेले बॉंब कमी तीव्रतेचे आहेत. ते काही आठवड्यांपूर्वीच तयार करण्यात आले असावेत, असा एटीएसला संशय आहे.

दाभोलकर, पानसरे हत्येशी संबंध?
काही व्यक्ती घातपास घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक तपासानंतर एटीएसचे पथक नालासोपारा येथे गेले. ते तीन दिवस तेथे तळ ठोकून होते. त्यांचे लक्ष्य कोण होते? नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी त्यांचा संबध आहे का, या दृष्टीनेही एटीएस तपास करत आहे. स्वातंत्र्यदिनी ते घातपास घडवण्याच्या तयारीत होते का, याबाबतची चौकशी केली जाणार आहे. जप्त करण्यात आलेले बॉंब कोणी बनवले, ते कुठे ठेवण्यात येणार होते, त्या तिघांवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली होती, याचाही तपास होणार आहे. याप्रकरणी एटीएसने 15 जणांची चौकशीही केली आहे. तपासासाठी एटीएस सायबर गुन्हे शाखेचीही मदत घेणार आहेत.

वैभव राऊत याचा सनातनशी संबंध आहे की नाही, हे अजून सिद्ध झाले नाही. तपासानंतर सत्य समोर येईल.
- दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री

सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जात आहे. विनाकारण संस्थेला बदनाम करण्यात येत आहे.
- संजीव पुनाळेकर, "सनातन'चे कायदेशीर सल्लागार

Web Title: ATS raids Vaibhav Rauts house in Nalasopara 8 crude bombs recovered