कोपर्डी आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

न्यायालयाच्या आवारातील प्रकार; शिवबा संघटनेचे चार कार्यकर्ते ताब्यात
नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केलेल्या गुन्ह्यामधील आरोपीवर आज न्यायालयाच्या आवारात दुपारी धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. एका महिला कर्मचाऱ्यासह तीन पोलिसांच्या प्रसंगावधानाने आरोपी बचावले.

न्यायालयाच्या आवारातील प्रकार; शिवबा संघटनेचे चार कार्यकर्ते ताब्यात
नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केलेल्या गुन्ह्यामधील आरोपीवर आज न्यायालयाच्या आवारात दुपारी धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. एका महिला कर्मचाऱ्यासह तीन पोलिसांच्या प्रसंगावधानाने आरोपी बचावले.

भिंगार कॅंप पोलिसांनी बाबूराव वामन वाळेकर (वय 30, रा. अंकुशनगर (महाकाळा), ता. अंबड, जि. जालना), राजेंद्र बाळासाहेब जऱ्हाड पाटील (रा. परांडा, ता. अंबड, जि. जालना), अमोल सुखदेव खुने पाटील (वय 25) व गणेश परमेश्‍वर खुने पाटील (वय 27, दोघे रा. रुई धानोरे, ता. गेवराई, जि. बीड) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी गुन्हे दाखल करण्यात आले. सहायक फौजदार विक्रम भारती यांनी फिर्याद दिली.

कोपर्डी खटल्याच्या सुनावणीसाठी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना पोलिसांनी सकाळी न्यायालयात आणले. सुनावणी संपल्यानंतर दुपारी 12.45 वाजता ते आरोपींना न्यायालयातून वाहनाकडे नेत होते. त्याच वेळी धारदार शस्त्रे घेतलेले चार तरुण पुढे आले व त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच न्यायालयीन कामकाजासाठी तेथे आलेले पोलिस कर्मचारी रवी टकले, महेश बोरुडे व बंदोबस्तात असलेल्या कल्पना आरोडे क्षणाचाही विलंब न लावता धावल्या. त्यांनी या चौघांना पकडून त्यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेतली. या झटापटीत टकले यांच्या पायाला व हाताला जखमा झाल्या.

बंदोबस्तावरील इतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपींना न्यायालयात सुरक्षित स्थळी नेले. या प्रकाराने न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडाला. "पोलिसांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला,' असे घटना पाहणाऱ्यांनी सांगितले.

हल्ल्याचा प्रयत्न करणारे चौघेही शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आहेत. या संघटनेचा विस्तार मराठवाड्यात, त्यातही प्रामुख्याने जालना व बीड जिल्ह्यांमध्ये आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर या आधी दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध केला. ते म्हणाले, 'खटल्याचे कामकाज सुरळीत आणि शांततेत चालू आहे. अशा वेळी त्यात अडचण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याचा धाक दाखवला पाहिजे. यापुढे सुनावणीच्या वेळी अनाहूत व्यक्तीला न्यायालयाच्या आवारात येण्याला प्रतिबंध केला पाहिजे.''

सुनावणीच्या वेळी संरक्षण
आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी व ऍड. निकम यांच्यात सरकारी विश्रामगृहावर तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली. कोपर्डी खटल्याच्या सुनावणीसाठी यापुढे न्यायालयाच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल. राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडीही असेल. आरोपीच्या वकिलांनाही व्यक्तिगत संरक्षण पुरविले जाईल, असे या चर्चेत ठरल्याची माहिती ऍड. निकम यांनी दिली.

कोणत्या जाती-धर्मावरील नव्हे, तर समाजाच्या कठोर गुन्हेगारावरील हा हल्ला आहे. समाजावर अन्याय करणाऱ्यांना आता असाच धडा शिकविला जाईल. हल्ल्याचा प्रयत्न करणारे चौघे माझे कार्यकर्ते असल्याचा अभिमान आहे.
- मनोज जरांगे, संस्थापक, शिवबा संघटना

Web Title: attack trying in kopardi accused