पोलिसांवर हल्ला केल्यास पाच वर्षांची शिक्षा -  मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

पोलिस व सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यास कलम 353,332 यानतंर्गत 5 वर्षाची शिक्षा होणार आहे. तसेच अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. यापूर्वी ही शिक्षा दोन वर्षांची होती.

नागपूर - राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये 4.92% घट झाली असून, यापुढे सरकारी कर्मचारी व पोलीसांवर हल्ला केल्यास पाच वर्षांची शिक्षा होणार असल्याचे आज (शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस व सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की पोलिस व सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यास कलम 353,332 यानतंर्गत 5 वर्षाची शिक्षा होणार आहे. तसेच अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. यापूर्वी ही शिक्षा दोन वर्षांची होती. राज्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. महिलांवरील गुन्ह्यातही घट झाली आहे. महिलांवर ९७ टक्क्यांपेक्षा ज्यास्त गुन्हे ओळखीच्या व्यक्तीकडून होत आहेत. या गुन्हेगारांवर कारवाई करू. विनयभंगाच्या गुन्ह्यातही घट झाली आहे. 22 जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात 24 तासांच्या आत आरोपपत्र दाखल केले जात आहे. डिजिटलमधील गुन्ह्यांत वाढ झाली असून, यासाठी प्रत्येक जिल्यात सायबर लॅबची सुरुवात केली आहे. पोलिसांवरील गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यात साडेतेरा टक्के घाट झाली. दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा यासारख्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात लोकसंख्येच्या तुलनेत कमी गुन्हे घडत आहेत. दखलपात्र गुन्ह्यांत देशात महाराष्ट्र नववा आहे. आपणच आपल्या राज्याची बदनामी करू नये.

कोल्हापूरचे पोलीस ब्रिटिशकालीन घरात राहतात. 99,971 सदनिकांची पोलिसांना गरज आहे. 48 हजार निवासस्थानांचे नियोजन केले आहे. उरलेल्या निवासांची योजना करण्यात येत आहे. नागपूर देशातील क्राईम कॅपिटल झाल्यासारखे विरोधकांनी सांगितले. दहावर्षांपासून पोलीस स्टेशन वाढवण्याची मागणी होती, पण विरोधकांनी केली नाही. आम्ही 5 नवी पोलिस ठाणी सुरु केली आहेत. नागपूरला उद्योग येतायत हे विरोधाकांना पाहवत नाही? विनाकारण एखाद्या शहराला बदनाम करू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Attacks on cops lead to jail for 5 years in Maharashtra says Devendra Fadnavis