खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या, वाकोल्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Audio clip crime against Sanjay raut at Vakola Police Station mumbai

खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या, वाकोल्यात गुन्हा दाखल

मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही आहेत. एका महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 504, 506 आणि 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्राचाळ घोटाळ्यात साक्षीदार असलेल्या महिलेने संजय राऊत यांची एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती आणि त्यानंतर वाकोला पोलीस ठाण्यात एनसी अज्ञात व्यक्ती विरोधात दाखल करण्यात आली होती. रविवारी वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सकाळ’शी बोलाताना वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप मोरे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे कलम 504,506,509 अंतर्गत वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार काय?

गोरेगाव येथील पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासंदर्भात म्हाडा आणि गुरुआशीष कन्स्ट्रक्शन यांच्यात करार करण्यात आला होता. त्यानुसार गुरुआशीष कन्स्ट्रक्शनकडून ६७२ घरांचा पुनर्विकास करण्यात येणार होता; तसेच पुनर्विकासानंतर इतर जागेत विकसक बांधकाम करून विक्री करणार होते; मात्र ६७२ घरांचा पुनर्विकास करण्याऐवजी विकसकाने म्हाडाच्या डोळ्यात धूळफेक करत ९०१.७९ कोटी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर गुरुआशीष कन्स्ट्रक्शनने ‘मिडोज’ नावाच्या आणखी एका प्रकल्पात सदनिका खरेदीदारांकडून १३८ कोटी रुपये घेतले. जवळपास एकूण १०३९.७९ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले. तसेच प्रवीण राऊत यांच्या खात्यात जवळपास १०० कोटी रुपये एचडीआयएलकडून हस्तांतरित करण्यात आले. तसेच वर्षा राऊत यांच्या खात्यात ५५ लाख रुपयांचा व्यवहार झाला. दरम्यान, पुनर्विकास प्रकल्पातील अनियमितता तसेच संजय राऊत यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत झालेल्या संबंधित व्यवहारांत मनीलॉण्डरिंग झाल्याचा ईडीचा आरोप आहे.

यापूर्वीही राऊतांवर कारवाई

एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांचे अलिबाग येथील आठ भूखंड आणि मुंबईतील एका सदनिकेवर जप्तीची कारवाई केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली होती. त्यापाठोपाठ पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करण्यात आली असतानाच मुंबई पोलिसांनीही गुन्हा दाखल केल्याने राऊतांच्या अडचणीत भर पडलीये.

Web Title: Audio Clip Crime Against Sanjay Raut At Vakola Police Station Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..