राज्यात मुलांच्या तुलनेत अकरा लाख मुली कमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मराठवाड्यात गंभीर परिस्थिती; बीड सर्वांत पिछाडीवर

मराठवाड्यात गंभीर परिस्थिती; बीड सर्वांत पिछाडीवर
औरंगाबाद - मुलींचा जन्मदर हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय झाला असून, मराठवाड्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती भ्रूणहत्येने गाजलेल्या बीड जिल्ह्याची आहे. या जिल्ह्यात एक हजार मुलांमागे 912 मुली आहेत; तर परभणी जिल्ह्यात मुलींचा जन्मदर 940 इतका आहे. राज्यात मुलांच्या तुलनेत अकरा लाख मुली कमी असल्याचे वास्तव आहे.

केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने 2017 मध्ये प्रकाशित केलेल्या "यूथ इन इंडिया'नुसार 2021 मध्ये मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे 907 इतका घटेल; तर 2031 मध्ये हाच आकडा 898 पर्यंत खाली येईल. 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार 6 ते 10 वयोगटात महाराष्ट्रात 54,36,233 मुले आणि 48,22,446 मुलींचे प्रमाण आहे. 11 ते 13 वयोगटात 32,89,087 मुले आणि 27,74,192 मुली आहेत.

ही आहेत कारणे
- मुली म्हणजे जबाबदारी, ओझे वाटणे
- मुलीच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर वाटणे
- हुंडा पद्धतीमुळे मोठी रक्कम कशी उभी करावी, ही चिंता वाटणे
- मुलगी परक्‍याचे धन असा पारंपरिक समज.
- रुढी-परंपरांचा पगडा

कायद्याची अंमलबजावणी आवश्‍यक
सरकारने प्रसूतिपूर्व लिंगनिदान करण्यास प्रतिबंध केलेला आहे. अशा चाचण्या केल्यास शिक्षेची तरतूद आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने या प्रकरणात लक्ष घालण्याच्या प्रत्येक राज्य शासनाला सूचना केलेल्या आहेत; मात्र या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत.

Web Title: auraangabad maharashtra news boy and girl precentage