राज्यातील अकरा पोलिस ठाणी होणार "स्मार्ट'

मनोज साखरे
शुक्रवार, 2 जून 2017

औरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा समावेश

औरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा समावेश
औरंगाबाद - सीसीटीएनएसद्वारे सर्व पोलिस ठाणी जोडल्यानंतर पोलिस विभाग खऱ्या अर्थाने आता डिजिटल होत आहे. बहुतांश ठिकाणी ऑनलाइन कामकाज सुरू झाले. यापुढील टप्पा स्मार्ट पोलिस स्टेशनचा असून, राज्यातील अकरा पोलिस ठाणी स्मार्ट होणार आहेत. विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक पोलिस आयुक्तालय व ग्रामीण मुख्यालयातील एका पोलिस ठाण्याचा समावेश स्मार्ट पोलिस ठाण्यात होणार आहे. राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, अमरावती आदी जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांचा स्मार्ट पोलिस ठाण्यात समावेश झाला आहे. यासंबंधी मुंबईत बैठक झाली असून, यात ही घोषणा करण्यात आली. विभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी सांगितले, 'स्मार्ट पोलिस ठाण्यांत पोलिस कर्मचारी स्मार्ट असतील; तसेच नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळतील. सीसीटीव्ही लावणे, एफआयआरची प्रत फिर्यादीपर्यंत पोचविण्यासोबत शंभर टक्के ऑनलाइन कामकाज या ठाण्यांचे चालणार आहे. अन्य ठाण्यांपेक्षा ही ठाणी अद्ययावत राहतील.''

कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन
गृह विभागाने स्मार्ट पोलिस स्टेशन ही नवीन संकल्पना मांडली होती. यात सर्व कर्मचाऱ्यांकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन असतील. इंटरनेट वापरण्यात त्यांचा हातखंडा असावा. विशेषत: कागदपत्रांची जागा सॉफ्ट कॉपी घेईल. त्यामुळे कामाचा वेग वाढून नागरिक, फिर्यादींना पोलिस ठाण्यापर्यंत येण्याची गरज राहणार नाही, असा उद्देश यामागील आहे.

ही ठाणी होणार स्मार्ट
-बीके सी : मुंबई शहर
-खारघर : नवी मुंबई
-हिंजवडी : पुणे शहर
-सरकारवाडा : नाशिक शहर
-नादगाव पेठ : अमरावती शहर
-शिवाजीनगर : कोल्हापूर
-सातार तालुका : सातारा
-वैजापूर : औरंगाबाद ग्रामीण
-सिल्लोड : औरंगाबाद ग्रामीण
-बिडकीन : औरंगाबाद ग्रामीण
-एमआडीसी वाळुज : औरंगाबाद शहर

Web Title: aurangabad maharashtra news 11 police station smart in state