राज्यात आठ शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात कर्जबाजारी आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत आठ जणांनी जीवन संपविले. त्यात शेतकरी दाम्पत्याचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या मुलानेही आत्महत्या केली. 

औरंगाबाद - मराठवाड्यात कर्जबाजारी आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत आठ जणांनी जीवन संपविले. त्यात शेतकरी दाम्पत्याचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या मुलानेही आत्महत्या केली. 

चिमठाणे - हाती पैसा नसताना नातेवाइकांकडून उसने घेऊन कशीतरी पेरणी केली, पीकही चांगले उगवले, पण नंतर पावसाने जी दडी मारली ती आजतागायत कायम असल्याने कोवळी पिके कधीच करपून गेली. चांगला हंगाम आणि उत्पन्नाचे स्वप्न असे हवेत विरल्याने धक्का बसलेल्या दरखेडा (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्याने आज विषारी औषधाचे सेवन करीत आत्महत्या केली. या घटनेने गावही सुन्न झाले असून, पावसाअभावी शेतकऱ्यांची अवस्था किती भयाण होत चालली आहे हेच यावरून दिसते.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्‍यातही आज दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात तरुण शेतकऱ्याने स्वतः  ट्रान्स्फॉर्मरवरील वीजतारेला स्पर्श करत आपली जीवनयात्रा संपविली, तर वृद्ध शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. 

मराठवाड्यात शेतकरी दाम्पत्याने घरी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना आनंदनगर (ता. पाथरी) येथे घडली. अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण जेसू पवार (वय ६०), पत्नी चपलाबाई लक्ष्मण पवार (वय ५५) अशी त्यांची नावे आहेत. बोरखेडी तांडा (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील शेतकरी श्रीरंग रेवा राठोड (वय ५५) यांनी सकाळी विष घेतले. उपचारासाठी हिंगोलीत नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वह्या, पुस्तके, शैक्षणिक शुल्कासाठी पैसे न मिळाल्याने बावी (ता. वाशी) येथील शेतकऱ्याच्या मुलाने सकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, नबीलाल महमंद आतार यांचा मुलगा अरबाज नबीलाल आतार (वय १३) हा कळंबमधील विद्याभवन हायस्कूलमध्ये शिकत होता. नाशिक जिल्ह्यात बोराळे (ता. चांदवड) येथील आप्पा खंडेराव जाधव (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली. बोराळे गावाजवळील ट्रान्स्फॉर्मरवर चढून वीजतारेला स्पर्श करून आप्पा जाधव यांनी आपले जीवन संपविले. आप्पा जाधव यांनी सोसायटीकडून २०१० ला ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्ज भरता येत नसल्याने त्यांना नाशिक जिल्हा बॅंकेकडून जप्तीची अंतिम नोटीस आली होती. 

शिवरे (ता. चांदवड) येथील कचरू पुंजा आहेर (वय ६५) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. आहेर अत्यवस्थ झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना वणी (ता. दिंडोरी) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बागूल यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मी आता कायमस्वरूपी कर्जमुक्त होणार
शिरूर अनंतपाळ - ‘मी आता कायमस्वरूपी कर्जमुक्त होणार’ असे गावात सांगत कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सुमठाणा (ता. शिरूर अनंतपाळ) येथे मंगळवारी (ता. २०) रात्री घडली. बालाजी शंकर बिरादार (वय ४७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दिवसभर गावात भेटेल त्याला ते ‘मी आता कायमस्वरूपी कर्जातून मुक्त होणार आहे, मला कोणाच्या मदतीची गरज नाही’, असे सांगत होते. सायंकाळी स्वतःच्या शेतात जाऊन त्यांनी जीवन संपविले. ते अल्पभूधारक असून बॅंक, खासगी कर्जाचा बोजा होता. कर्जफेड कशी करायची, या विवंचनेत ते होते.

Web Title: aurangabad maharashtra news 8 farmer suicide in state