बुलेट ट्रेन @ मुंबई ते नागपूर व्हाया औरंगाबाद!

बुलेट ट्रेन @ मुंबई ते नागपूर व्हाया औरंगाबाद!

व्यवहार्यता तपासणी अहवालात शहराचा समावेश 

औरंगाबाद - बुलेट ट्रेनने औरंगाबादकरांना आगामी काळात प्रवास करणे शक्‍य होणार आहे. देशभरात करण्यात आलेल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या व्यवहार्यता तपासणी अहवालात (फिजिबिलिटी रिपोर्ट) औरंगाबादला स्थान मिळाले आहे. नागपूर आणि मुंबईदरम्यान उभारण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पात औरंगाबाद हे स्टेशन असणार आहे. 

सध्या रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणासाठी आणि नव्या रेल्वेमार्गांसाठी झुंजणाऱ्या औरंगाबादेतून आगामी काळात बुलेट ट्रेन धावू शकणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने देशातील विविध बुलेट ट्रेन कॉरिडॉरची फिजिबिलिटी तपासण्यात आली. यापैकी दिल्ली आणि अमृतसर बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा अंतिम अहवाल केंद्राला सादर करण्यात आला आहे; तर दिल्ली - कोलकाता कॉरिडॉरवर काम सध्या सुरू आहे. देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे उभारण्यासाठी विविध कॉरिडॉरची व्यवहार्यता तपासण्यात आली. या तपासणीतील व्यवहार्यता तपासणी अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्यात आला असून, यात औरंगाबादलाही स्थान मिळाले आहे. या हाय स्पीड कॉरिडॉरमध्ये दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, मुंबई-नागपूर, दिल्ली - अमृतसर या मार्गांचा समावेश राहणार आहे. यापैकी दिल्ली-कोलकाता कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष कामाला २०२१ मध्ये सुरवात करण्यात येणार असून, त्यानंतर साधारण १५ ते २० वर्षांमध्ये या सगळ्या मार्गांवरील प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी असलेल्या नागपूरदरम्यान बुलेट ट्रेन उभारणीचा प्रकल्प व्यवहार्यता अहवालही सादर झाला आहे. त्यात औरंगाबादचा समावेश करण्यात आला आहे. या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनला औरंगाबादेत थांबा देण्यात येणार आहे. या मार्गावर औरंगाबादव्यतिरिक्त नाशिक, अकोला आणि अमरावती या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठीचा अंतिम अहवाल या ऑक्‍टोबर महिन्यात सरकारकडे जाणार आहे.   

वेग २५० ते ३०० किमी प्रतितास     
भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने देशातील रेल्वेंचा वेग वाढवण्यासाठी प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी भारतीय हाय स्पीड रेल्वे निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. विद्यमान रेल्वे जाळ्यात धावणाऱ्या रेल्वेंचा वेग १६० किमी प्रतितासापर्यंत नेण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या माध्यमातून २५० ते ३०० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या रेल्वेंसाठी जाळ्यांची उभारणी करण्याचे कामही या संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. 

नागपूर राहणार जंक्‍शन 
औरंगाबादेतून धावणारी नियोजित बुलेट ट्रेन ही केंद्र सरकारच्या ‘डायमंड क्‍वॉडिलॅटरल’ या प्रकल्पाचा भाग आहे. या माध्यमातून दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता ही महत्त्वाची आणि वेगवेगळ्या दिशेला असलेल्या शहरांची जोडणी करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामध्ये या क्वॉडिलॅटरलला मधोमध भेदणारी लाइन (मुंबई - कोलकाता) औरंगाबादेतून जाणार असल्याने औरंगाबादची कनेक्‍टिव्हिटी कोलकातापर्यंत वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय दिल्लीकडून चेन्नईच्या दिशेने जाणारा मार्गही नागपूर हे जंक्शन म्हणून काम करणार असल्याचे भारतीय हाय स्पीड रेल्वे निगम लिमिटेडच्या नकाशावर स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com