'अस्मितादर्श'ची 'लेणी' पोरकी 

Gangadhar-Pantavane
Gangadhar-Pantavane

डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन 
औरंगाबाद - मराठी साहित्याचे अभ्यासक, "अस्मितादर्श' चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे (वय 80) यांचे आज पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. 

डॉ. पानतावणे 22 डिसेंबरपासून आजारी होते. त्यांच्यावर येथील माणिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. प्रकृती उपचाराला दाद देत नसल्याने त्यांना सोमवारी एमआयटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना भारत सरकारतर्फे नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर झाला होता. 

नागपूर येथे जन्मलेले डॉ. पानतावणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. "अस्मितादर्श' नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी दलित लेखक, कवींना पाठबळ देणारी चळवळ चालविली. त्यांचे "मूल्यवेध', "विद्रोहाचे पाणी पेटले आहे', "दलितांचे प्रबोधन', "वादळाचे वंशज', "प्रबोधनाच्या दिशा', "हलगी', "चैत्य', "दलित वैचारिक वाङ्‌मय', "लेणी', "स्मृतिशेष', "बुद्धचिंतन' आदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील सॅन होजे येथे 2009 मध्ये झालेल्या पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

अल्पपरिचय 
डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे 

जन्म - 28 जून 1937 (नागपूर). पानतावणे यांचे शालेय शिक्षण नागपूर येथील डी. सी. मिशन स्कूल, नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण बी.ए., एम.ए. नागपूर महाविद्यालय येथे झाले. औरंगाबाद येथील तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांना डॉक्‍टरेट पदवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विभागप्रमुख पदावरून निवृत्त 
संपादक - अस्मितादर्श 
ग्रंथनिर्मिती - मूल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, मूकनायक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे प्रबोधन, वादळाचे वंशज, प्रबोधनाच्या दिशा, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, दलित वैचारिक वाङ्‌मय, लेणी, साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य : शोध व संवाद, स्मृतिशेष, अर्थ आणि अन्वयार्थ, आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता, बुद्धचिंतन, विद्रोह, विज्ञान आणि विश्‍वात्मकता, साहित्यनिर्मिती : चर्चा आणि चिकित्सा, किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड. 

संपादित ग्रंथ - दलित आत्मकथन, दलित कथा, विचारयुगाचे प्रणेते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकचळवळीचे प्रणेते : महात्मा जोतिबा फुले, महारांचा सांस्कृतिक इतिहास, लोकरंग, स्त्री आत्मकथन, धम्मचर्चा, दलित

साहित्य - चर्चा आणि चिंतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन ग्रंथ, भ्रांत निभ्रांत, महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे काढण्यात आलेला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश. 

ग्रंथ पुरस्कार - "साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती' ग्रंथासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार, "दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन' ग्रंथासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार. "दलितांचे प्रबोधन' या ग्रंथासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार, "चैत्य'साठी पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि "अस्मितादर्श'ला उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार. 

काही बहुमान - नुकताच भारत सरकारने जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार लंडन (इंग्लंड), अमेरिकेतील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, फाय फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्कार, हूज हू एशिया, किर्लोस्कर जन्मशताब्दी पुरस्कार, स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार, फुले-आंबेडकर स्मृती पुरस्कार, आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार आदी.

पानतावणे निधन प्रतिक्रिया
व्यासंगी समीक्षक हरपला 

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, पद्मश्री प्रा. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्रातील एक प्रगल्भ लेखक व व्यासंगी समीक्षक हरपला. मराठी सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील कृतिशील विचारवंत म्हणून "अस्मितादर्श'कार प्रा. गंगाधर पानतावणे सरांचे नाव कायम अग्रणी राहील. पानतावणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! 
- शरद पवार, खासदार आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष. 

लेखणीला कृतिशीलतेची जोड 
डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनामुळे आपण लेखणीला कृतिशीलतेची जोड दिलेल्या विचारवंतास मुकलो आहोत. त्यांनी अनेकविध लेखनप्रकार हाताळले; मात्र त्याचा गाभा तेजस्वी आंबेडकरी विचार हाच होता. 
-हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष 

आंबेडकरी चळवळीचा मार्गदर्शक हरपला 
प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. व्यासंगी प्राध्यापक, कृतिशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या डॉ. पानतावणे यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान अस्मितादर्शक म्हणून समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील. 
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

साहित्य क्षेत्रातील हिरा निखळला 
डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील हिरा निखळला आहे. त्यांनी चळवळीच्या माध्यमातून अनेक लेखक व कवी घडविले. दलित साहित्य चळवळीला मोठे योगदान दिले. "अस्मितादर्श' या नियतकालिकाच्या माध्यमातून दलित साहित्य चळवळीला त्यांनी वैचारिक अधिष्ठान मिळवून दिले. 
- पंकजा मुंडे, ग्रामविकास आणि महिला व बालविकासमंत्री

एका युगाचा अस्त 
डॉ. पानतावणे यांचे जाणे हा एका युगाचा अस्त आहे. वर्ष 1960च्या सुमारास ते औरंगाबादला आले. निजामी पारतंत्र्यात पिचलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या मनाला ऊर्जितावस्था देण्यात वा. ल. कुलकर्णी, म. भि. चिटणीस, भालचंद्र नेमाडे आदींच्या साथीने त्यांनी मोठे कार्य केले. 
-प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद 

मराठी वाङ्‌मयाची हानी 
साठोत्तरी मराठी साहित्यात चार दशके तीन आंबेडकरी पिढ्यांना लिहिते करण्याचे कार्य करणाऱ्या डॉ. पानतावणे यांच्या निधनाने मराठी वाङ्‌मयाची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक चांगला समीक्षक मित्र गमावला. मराठी वाङ्‌मयाला तेवढ्याच आस्थेने समजून घेऊन दलित साहित्याचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचे श्रेय त्यांना जाते. 
- प्रा. दत्ता भगत, ज्येष्ठ नाटककार 

लेखक, कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान 
पानतावणे आणि मी विद्यापीठात एकाच विभागात अनेक वर्षे काम करीत होतो. ते विनम्र होते. त्यांचे घर म्हणजे लेखक आणि कार्यकर्त्यांसाठी मोठे आश्रयस्थान होते. दलित साहित्याच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी पदरमोड करून "अस्मितादर्श' चालविले, वाढविले आणि दलित साहित्याच्या विकासाला मोठा हातभार लावला. 
-डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन. 

दीपस्तंभ हरपला 
एकंदर मराठी समीक्षेतील जीवनवादी समीक्षकाचा पानतावणे यांच्या निधनाने अस्त झाला आहे. दलित साहित्याची समीक्षा व्यापक मानवतावादी भूमिकेतून करणारा व्यासंगी समीक्षक हरवला. "अस्मितादर्श' या नियतकालिकाच्या रूपाने आज त्यांचे स्मरण राहीलच; परंतु दलित साहित्यिकांना दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशाची वाट दाखवणारा ज्ञानसूर्य हरपला आहे. त्यांचे कार्य आपण ज्योतीप्रमाणे तेवत ठेवू. 
-प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, ज्येष्ठ साहित्यिक 

नव्या लेखकांना बळ देणारा संपादक 
"अस्मितादर्श'च्या माध्यमातून तळागाळातील अनेक नव्या लेखकांना सरांनी लिहिते केले. त्यांच्या वर्गातील मी विद्यार्थी आहे, याचा अभिमान वाटतो. आज देहरूपाने पानतावणे सर आपल्यात नाहीत; पण त्यांनी आपल्यासाठी मागे ठेवलेली ग्रंथसंपदा अजरामर आहे. 
-डॉ. दासू वैद्य, प्रसिद्ध कवी.

डॉ. पानतावणे यांचे जाणे हा एका युगाचा अस्त आहे. पानतावणे यांच्या "अस्मितादर्श'ने आंबेडकरी विचारांचा अभ्यास, प्रचार, प्रसार महाराष्ट्रभर केला. दुर्दैवाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होऊ शकले नाहीत; मात्र पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात मसापने पुढाकार घेतला होता. 
-प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद 

गुरुवर्य डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या जाण्याने "अस्मितादर्श' परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. या चळवळीच्या उभारणीपासून मी साक्षीदार राहिलो. आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार आणि संशोधनाचे त्यांनी केलेले कार्य आजही तरुण पिढीला मोठे मार्गदर्शक आहे. 
-डॉ. दादा गोरे, कार्यवाह, मराठवाडा साहित्य परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com