औरंगाबादची हवा हानिकारक

आदित्य वाघमारे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

"एअर क्वालिटी इंडेक्‍स' वाजवतोय धोक्‍याची घंटा 

देशातील काही शहरांचा शनिवारी (ता. 17) सायंकाळचा "एक्‍यूआय' 
​कोलकता ः 190 
मुंबई ः 153 
दिल्ली ः 162 
औरंगाबाद ः 158 
चेन्नई ः 75 
पुणे ः 166 
नागपूर ः 159 
सुरत ः 128 

औरंगाबाद- शहरात वावरत असताना आपण घेत असलेला श्वास हा रोगांचे ओझे लादणारा ठरतो आहे. शहराच्या हवेत रोगांचा राबता असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद शहराचा "वायू गुणवत्ता निर्देशांक' (एक्‍यूआय) धोक्‍याची घंटा वाजवत असून, शहरातील हवा अनेकदा मुंबई, पुणे आणि नागपूरच्या तुलनेने अधिक धोकादायक असल्याचेही यातून समोर आले आहे.

औरंगाबादच्या हवेला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण "एक्‍यूआय'ने दाखवले आहे. शहरांच्या हवेची प्रत सांगणाऱ्या या यंत्रणेने आठवडाभराच्या सर्वेक्षणात एकदाही "आरोग्यदायी हवा' असे म्हटलेले नाही. "वायू गुणवत्ता निर्देशांक'मध्ये हवेतील धूळ, ओझोन, नायट्रोजन डाय-ऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईडसारख्या वायूंचे प्रमाण मोजून आकडे सांगितले जातात. यामध्ये 0-50 चांगली, 51-100 साधारण चांगली, 101-150 चांगली नाही, रुग्णांसाठी धोकादायक, 151 ते 200 ः हानिकारक, 201 ते 300 ः अतिहानिकारक, 301 ते 500 ः घातक अशी वर्गवारी करण्यात आली आहे. औरंगाबादच्या हवेतील हे प्रमाण दीडशेच्या आसपास राहत असल्याने ते अनेक आजारांचे माहेरघर ठरत आहे.

काय आहेत परिणाम? 
त्वरित जाणवणारे त्रास ः श्वसनात अडथळे, छातीत दुखणे, घशात सूज, नाक चोंदणे, डोळ्यांची आग होणे, दम्याचा धोका, खोकला. 
दूरगामी त्रास ः फुफ्फुसांच्या पेशींना धोका, कर्करोग, दमा, अकाली मृत्यू

Web Title: Aurangabads air is harmful