ऑस्ट्रेलियाने "समृद्धी'त गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 13 April 2017

मुंबई - ऑस्ट्रेलियाने मुंबई - नागपूर महामार्ग प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या भारतभेटीवर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबल यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. 

मुंबई - ऑस्ट्रेलियाने मुंबई - नागपूर महामार्ग प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या भारतभेटीवर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबल यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. 

टर्नबल यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा विकास, यासह अनेक विषयांची माहिती घेतली. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आता 20 अब्ज डॉलर आहे. तथापि, यापुढे तो अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टर्नबल यांचे स्वागत करताना, महाराष्ट्राची लोकसंख्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या एकत्रित लोकसंख्येच्या चौपट असून, 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेली युवक लोकसंख्या हे राज्याचे बलस्थान आहे. राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतवणूक करण्यास मोठी संधी असून ऑस्ट्रेलियाने सेवानिवृत्त कोश राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवावा, अशी विनंती राज्यपालांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना केली. 

राज्यात वीस विद्यापीठे असून तीन दशलक्ष विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असल्याचे राव यांनी सांगितले. या संदर्भात महाराष्ट्रातील विद्यापीठे व ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांना संशोधन, कौशल्य विकास व विद्यार्थी देवाण- घेवाण या क्षेत्रात सहकार्याची संधी आहे, असे ते म्हणाले. 

मुंबई- नागपूर महामार्ग हा 700 किमी लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला असून, त्यासाठी सहा अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित आहे. या महामार्गामुळे राज्याचा 70 टक्के प्रदेश थेट जवाहरलाल नेहरू बंदराशी जोडला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुंबई शहरात देशातील सर्वांत मोठा मेट्रो रेल्वे प्रकल्प तयार होत असून, प्रस्तावित किनारपट्टी मार्गामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका होणार असल्याची माहिती त्यांनी टर्नबल यांना दिली. महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी क्रीडाक्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia to invest in samrudhi - minister